हॉकी बेलगामच्या मोफत प्रशिक्षण शिबिराला नवोदित युवा हॉकीपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : विद्यार्थ्याच्या विकसित होण्यामध्ये शिक्षण खेळाचे योगदान खूप मोठे आहे. विद्यार्थ्यांना खेळाकडेही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. हॉकी बेळगावने मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर करून होतकरु विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा. यामुळे देशात देखील बेळगावचे हॉकी मधील नांव उज्वल पुन्हा एकदा होईल, असे मत मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे डेप्युटी कमांडंट कर्नल चंद्रनील रामनाथकर यांनी काढले. ते हॉकी बेलगाम आयोजित मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे होते. येथील मुलांमध्ये हॉकीची आवड निश्चितच त्यांना यशापर्यंत पोहोचवेल. मुला मुलींना हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विशेषत: पालकांचे कौतुक करावं तितके कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
शशिकला सिंगबाळ हिने स्वागत गीत म्हटले. पाहुण्यांचे स्वागत प्रकाश कालकुंद्रीकर यांनी केले. शिबिराचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालून ऑलिम्पियन सुभेदार बंडू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून डेप्युटी कमांडंट कर्नल चंद्रनील रामनाथकर यांनी केले. प्रमुख पाहुणे डेप्युटी कमांडंट कर्नल जनरल चंद्रनील रामनाथकर, महापौर मंगेश पवार, माजी महापौर आनंद चव्हाण, अशोक आयर्न ग्रुपच्या जयभारत फाउंडेशनचे संचालक बसवनगौडा पाटील, बीडीएचएचे अध्यक्ष धनंजय पटेल यांचा हॉकी बेळगावच्या वतीने अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, दत्तात्रय जाधव यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. महापौर मंगेश पवार व माजी उपमहापौर यांनी हॉकी प्रशिक्षण शिबिरास शुभेच्छा देऊन हॉकीसाठी अॅस्ट्रोटर्फ मैदान उपलब्ध करुन देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असे आश्वासन दिले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.









