वार्ताहर/किणये
खादरवाडी येथील ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने गावातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी गावमर्यादित धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. माजी सैनिक बाळाराम पाटील व इतर माजी सैनिकांच्या हस्ते फित कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिली ते दुसरी करिता 100 मीटर, तिसरी ते चौथीसाठी 400 मीटर, 5 ते 6 वीसाठी 600 मीटर, 7 ते 8 वीसाठी 800 मीटर, 9 व 10 वीसाठी दोन किलोमीटर अशा या धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब, देवस्थान कमिटी, एसडीएमसी कमिटी, शेतकरी संघटना, हायस्कूल व प्राथमिक शाळा व शिक्षक वर्ग यांचे सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित बिर्जे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन महादेव दळवी यांनी केले तर हायस्कूलचे मुख्याध्यापक खवनेकर यांनी आभार मानले.









