लंडन :
युकेमधील लक्झरी कार निर्माती कंपनी जग्वार लँड रोव्हर यांनी अमेरिकेला कार्सचा पुरवठा करणे तूर्तास थांबवले आहे. अमेरिकेने व्यापार शुल्क लादल्याच्या पार्श्वभूमीवर जग्वार लँड रोवरकडून हे पाऊल उचलले गेले आहे. एप्रिलपासून कंपनीने अमेरिकेमध्ये कारची निर्यात करणे थांबवले असल्याचे समजते आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीत कार वर 25 टक्के शुल्क जाहीर केल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. जग्वार, डिफेंडर आणि रेंज रोवर यासारख्या लक्झरी कार निर्मिती करणाऱ्या कंपनीचा अमेरिकेमध्ये निर्मिती कारखाना नसल्याने सध्याला तरी कंपनीने निर्यात बंद केली आहे.
कंपनी युकेत कारची निर्मिती करून अमेरिकेत निर्यात करते व विक्री करते. 2024 मध्ये तीन महिन्याच्या कालावधीत पाहता 38 हजार कारची निर्यात अमेरिकेला कंपनीने केली होती. जेएलआर लक्झरी कारसाठी अमेरिका ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. पण अमेरिकेने आता शुल्क आकारणी केल्याने जेएलआरला फटका बसणार आहे.









