कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयात (सीपीआर) खोटे दर करारपत्र दाखवून व्हीएस एंटरप्राईजेस या पुरवठादाराने कोट्यावधींचे बोगस सर्जिकल साहित्य पुरवल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित पुरवठादारासह सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात फौजादारी गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना पत्राद्वारे दिले आहेत. केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल संचालनालयास तत्काळ सादर करावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
सीपीआरमध्ये ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत ही सर्जिकल साहित्य खरेदी प्रक्रिया झाली होती. यामध्ये बोगस दर करारपत्रकाद्वारे तब्बल 4 कोटी 87 लाख 30 हजार 500 रुपयांच्या सर्जिकल साहित्याचा घोटाळा झाला आहे. या काळात कोणतीही खात्री न करता संबंधित ठेकेदाराला संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली. यावरून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे आणि संगनमताचे पुरावेही समोर आल्याचे पत्रात म्हंटले आहे. सीपीआर रुग्णालयात सर्जिकल साहित्य खरेदी प्रक्रियेत मोठ्या आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
कोणतीही खात्री न करता संबंधित ठेकेदाराला संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली. यावरून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे आणि संगनमताचे पुरावे समोर आले आहेत. या प्रकरणात पुरवठादारासह सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या सूचना दिल्याने सीपीआरमध्ये मोठी खळबळ उडाली असून, संबंधितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात पुढे 12 कोटी 19 लाख 50 हजार रुपयांचा सर्जिकल साहित्य खरेदी प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. यामध्ये ड्रेसिंग पॅडचे 10 हजार बॉक्स, चार द्रव औषधे यांचा समावेश होता. विभागाने डिसेंबर 2022 मध्ये तांत्रिक मान्यता दिली आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी खर्च करण्यास सांगितले. यावेळी तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व तत्कालिन अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित कार्यरत होते.
- मुलुंड ईएसआयएस रुग्णालयाच्या नावाने बनावट दर करारपत्र
व्हीएस एंटरप्राईजेसने निविदेमध्ये मुलुंडच्या ईएसआयएस रुग्णालयाचे दर करारपत्र जोडले होते. मात्र, चौकशीत हे पत्र रुग्णालयाच्या लेटरपॅडवर नसून साध्या कागदावर टाईप केलेले असल्याचे निष्पन्न झाले. 27 सप्टेंबर 2022 रोजी असे कोणतेही पत्र रुग्णालयातून पाठवले नसल्याचे स्पष्टीकरण अधिकृतरीत्या देण्यात आले. यामुळे संबंधित दर करारपत्र पूर्णत: बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून दोषींवर लवकरच कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित ठेकेदार, डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.








