पुसेसावळी :
पुसेसावळी (ता. खटाव) येथे चक्री गेमचा जुगार जोमात सुरु असून अनेक युवक गेमच्या कॅफेमध्ये दिसत आहेत. जुगारवेडे तरुण यामध्ये गुरफटत आहेत. येथील बेकायदा चक्री जुगार व ऑनलाइन लोटो, ऑनलाईन गेमकडे खाकीवाल्यांनी गांधारीची भूमिका घेतल्याने या अवैध धंद्याना बळ मिळत आहे, याप्रकरणी कडक कारवाई करण्याची गरज आहे. या चक्री जुगारामुळे व ऑनलाईन गेममुळे अनेक तरुण मुलं व अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
शहरातील जुन्या बसस्थानकासमोरील बोळातच चक्री गेम राजरोजपणे सुरु असून, या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने खाकीवाल्यांनी तातडीने या जुगारावर कारवाई करुन अवैध चक्री जुगार बंद करावा, अशी मागणी शहरातील नागरिक व महिलावर्गाकडून केली जात आहे.
या अवैध व्यवसायाला परवानगी असल्याप्रमाणे उघडपणे खेळला जातो. अनेक भागात हा धंदा जोमाने सुरु आहे. मात्र, पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. या धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. याकडे पोलीस गांभीर्याने लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
- जुन्ऱ्या बसस्थानकासमोरील बोळातच खेळ
जुन्या बसस्थानकासमोरील बोळातच चक्री गेमचा व्यवसाय सुरू असून या बोळातूनच पाठीमागे एक हॉटेल (मेस) आहे. प्रशासनातील काही जण या बोळातुनच हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी येत-जात असतात. परंतु येताना जाताना सुरू असलेल्या चक्रीचा व्यवसाय यांना दिसत नाही हे नवलचं म्हणावे लागेल. या अवैध व्यवसायाकडे काना डोळा करून प्रशासनच या अवैध व्यवसायाला पाठबळ तर देत नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.








