कुडाळ :
कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या सुरज आनंद पवार (31, मूळ रा. मळगाव–कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी) यांचा मृतदेह ते सध्या राहत असलेल्या कुडाळ–केळबाईवाडी येथील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये सिलिंगला असलेल्या पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. ही घटना सोमवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
आपण आत्महत्या करीत असल्याची कल्पना त्यांनी आपल्या एका मित्राला मोबाईलवर मेसेजद्वारे दिली होती. तपासाअंती सूरज यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबतची खबर त्यांचा भाऊ दिनेश आनंद पवार यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने कुडाळ पोलीस ठाण्यासह सिंधुदुर्ग पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सुरज पवार सन 2017 मध्ये सिंधुदुर्ग पोलीस दलात भरती झाले. त्यानंतर प्रथम कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर रुजू झाले. कुडाळ पोलीस ठाण्यांतर्गत आवळेगाव पोलीस दूरक्षेत्र येथे ते चार वर्षे कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वीच ते कुडाळ येथील पोलीस ठाण्यात कार्यरत झाले होते.
कुडाळ केळबाईवाडी येथील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्समध्ये ते एकटेच राहायचे. सोमवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी एका मित्राच्या मोबाईलवर ‘तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवित आहे’, अशा आशयाचा मेसेज पाठविला. त्या मित्राने याची कल्पना त्यांच्या मळगाव येथील भावाला दिली. ते तातडीने कुडाळला आले. तो राहत असलेल्या फ्लॅटवर गेले असता, लॅच की लॉक केले होते. परंतु चावी बाहेर ठेवलेली होती. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, सुरज पवार यांचा मृतदेह पंख्याला दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी त्यांना खाली उतरवून येथील ग्रामीण ऊग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटना समजताच सूरज यांचे नातेवाईक तसेच पोलीस ठाण्यातील सहकाऱ्यांनी ग्रामीण ऊग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट देऊन माहिती घेतली. सुरज यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. ते मळगाव–कुंभार्लीवाडी येथील मूळ रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन वर्षांचा मुलगा तसेच आई, भाऊ, वहिनी, बहिण, पुतण्या असा परिवार आहे. सुरज पवार शांत स्वभावाचे होते.
सूरज पवार सोमवारी सकाळी पिंगुळी येथील एका कार्यक्रमासाठी ड्युटीवर गेले होते. तेथून दुपारी ते पोलीस ठाण्यात आले आणि नंतर आपण राहत असलेल्या फ्लॅटवर गेले. तेथेच त्यांनी गळफास लावून आपले जीवन संपविले.








