पावसाळ्यापूर्वी नाले, गटारीतील प्लास्टिक-कचरा स्वच्छ करण्याची गरज : महापालिकेने लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : पहिल्याच अवकाळी पावसाळ्यात बेळगाव शहराची दाणादाण उडाली. गटारी, नाल्यांची सफाई करण्यात न आल्याने केरकचरा अडकून सांडपाणी रस्त्यावर आले. त्यामुळे शहरात सर्वत्र गलिच्छ वातावरण निर्माण झाले. प्रामुख्याने प्लास्टिकचा कचरा अडकल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शहर व उपनगरातील गटारी व नाल्यात अडकलेले प्लास्टिक महापालिकेने हटवावे, अशी मागणी केली जात आहे.
पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने अवकाळी पावसामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले. परिणामी पावसाचे आणि सांडपाणी रस्त्यावरून वाहण्यासह काही ठिकाणी दुकाने व घरातदेखील शिरण्याचे प्रकार घडले. सांडपाणी वाहून जाण्यासाठी प्रामुख्याने प्लास्टिक कचरा अडथळा ठरत आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने काम हाती घेण्याची गरज आहे. गटारी व नाल्यातील प्लास्टिक कचरा साफ केल्यास सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होणार नाहीत. प्लास्टिक कचरा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेबरोबरच नागरिकांनीही स्वत:ची जबाबदारी ओळखून सहकार्य करणे गरजेचे आहे.
ओल्ड पी. बी. रोड, येडियुराप्पा रोडवरील हॉटेल परिसर, खानापूर रोड, आझमनगर, कणबर्गी रोड, शिवाजी रोड, रुक्मिणीनगर, खडेबाजार, गणपत गल्ली, कॅम्प परिसर, न्यू गांधीनगर, खासबाग, विरभद्रनगर, शिवाजीनगर आदी ठिकाणी गटारी व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा अडकल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यावरदेखील ठिकठिकाणी प्लास्टिक कचरा पडल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीच्या हद्दीतदेखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. प्लास्टिक अडकून पडत असल्याने गटारी व नाले तुंबत आहेत. त्यामुळे सांडपाणी बाहेर पडत आहे. पावसाळ्यात ही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका व ग्राम पंचायतींनी प्रथम नाले व गटारीतील प्लास्टिक कचरा हटविणे गरजेचे आहे.
प्लास्टिक कचरा सिमेंट कंपन्यांना
शहर व उपनगरातून उचल केलेला प्लास्टिक कचरा तुरमुरी येथील घनकचरा प्रकल्पात नेऊन त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. तसेच प्लास्टिक कचरा दालमिया आणि जे. के. सिमेंट या कंपन्यांना दिला जातो. या कचऱ्याच्या माध्यमातून सिमेंट कंपन्याकडून रस्त्याची निर्मिती केली जाते. सिमेंट कंपन्यांकडून प्लास्टिक कचऱ्यांची उचल केली जात असल्याने प्लास्टिक कचऱ्याची डोकेदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. बेळगाव मनपाकडून दरवर्षी 3 ते 4 हजार टन प्लास्टिक कचरा सिमेंट कंपन्यांना दिला जातो. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लागत असल्याने मनपाची अर्धी डोकेदुखी कमी झाली आहे.
प्लास्टिक विक्री करणाऱ्यांकडून दंड वसूल
1 जुलै 2022 ते 31 मार्च 2024 पर्यंत निर्बंध असलेल्या प्लास्टिकची विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकून 5.16 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सिंगल यूज प्लास्टिकची विक्री आणि वापर करण्यात येऊ नये यासाठी महापालिकेकडून जनजागृती केली जात आहे.
– हनुमंत कलादगी, पर्यावरण अभियंता महापालिका बेळगाव.









