वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्षाला मोठा झटका बसला आहे. बसप सरकारमध्ये मंत्री राहिलेले दद्दू प्रसाद यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. दद्दू प्रसाद हे उत्तरप्रदेशातील मानिकपूर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार ठरु शकतात. प्रसाद हे येथील माजी आमदार राहिले आहेत.
इंद्रजीत सरोज, बाबू सिंह कुशवाह हे बसपचे दिग्गज नेते आता समाजवादी पक्षात आहेत. बसपच्या आणखी मातब्बर नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न समाजवादी पक्षाकडून सुरू आहेत. अखिलेश यादव यांनी बसपच्या दलित नेत्यांना स्वत:च्या बाजूने वळविण्याची रणनीति आखली आहे. दद्दू प्रसाद यांच्यासोबत सलाउद्दीन (माणिकपूरचे नगराध्यक्ष), देवरंजन नागर, जगन्नाथ कुशवाह यांनी देखील समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
दद्दू प्रसाद आणि त्यांच्या समर्थकांचे मी स्वागत करतो. सपमध्ये मोठ्या संख्येत लोक दाखल होत आहेत. सलाउद्दीन, देवरंजन हे नेते देखील पक्षाला मजबूत करणार असल्याचे उद्गार लखनौ येथील सप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी काढले आहेत.









