अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कारभाराला अवघ्या अडीच महिन्यात वैतागलेल्या अमेरिकन जनतेने निदर्शने करून आपला कारभार थांबवावा अन्यथा महाभियोग आणावा लागेल असा सूचक इशारा देणारे आंदोलन पुकारले आहे. विविध सरकारी विभागांतून कर्मचाऱ्यांची कपात, आयात शुल्कामुळे महागाईवाढीची शक्यता, ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाविरोधातील अध्यादेश आणि इतर अनेक निर्णयांचा व धोरणांचा निषेध करत आहे. अमेरिकी जनता जोरदार निदर्शन करत ‘हँड्स ऑफ’ नावाच्या या आंदोलनात उतरली आहे. अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये जवळपास 1200 ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनांचे आयोजन करण्यात आले. शनिवारी बॉस्टन, शिकागो, लॉस एंजल्स, न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीसह इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी होती. अमेरिकेच्या रस्त्यावर असे हजारो लोक अचानक उतरतील याची कल्पना कदाचित त्यांना सुद्धा नसेल. अडीच महिन्यात ट्रम्प यांनी ज्या बेदरकारपणे जगातील अनेक देशांना ललकारत आपले टेरीफ धोरण ताणले. त्याचा परिणाम अमेरिकेवर देखील झाला आहे. वाढत्या आयात शुल्कामुळे महागाई वाढेल या चिंतेपोटी लोक संताप व्यक्त करू लागले आहेत. त्यातच त्यांच्या आरोग्य सुविधांवर परिणाम करणारे धोरण राबवून लोकांना असुरक्षित बनवले जात असल्याचीही जनतेची भावना झालेली आहे. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांपासून स्थानिकांपर्यंत सर्वजण विरोधात उतरले आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये हजारो आंदोलक डेमोक्रॅटिक खासदारांची भाषणं ऐकण्यासाठी जमले होते. त्यापैकी अनेकांनी ट्रम्प प्रशासनात महत्त्वाची भूमिका निभावणारे श्रीमंत देणगीदार आणि प्रामुख्याने इलॉन मस्क यांच्यावर टीका केली. आमचं सरकार अब्जाधीशांनी ताब्यात घेतलं आहे अशी तिथल्या जनतेची संतप्त भावना झाली आहे. ती देखील ट्रम्प यांच्या सत्तेवर येण्याच्या अवघ्या तीन महिन्याच्या आत! मेक अमेरिका ग्रेट अगेन अर्थात मागा हे सर्वसामान्य अमेरिकन जनतेला चांगले वाटले होते. त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जनतेने त्यांना पुन्हा सत्तेवर आणले. पण, सत्तेवर येताच ट्रम्प यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये इलॉन मस्क यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांच्यावरही निदर्शकांनी राग व्यक्त केला. ‘आम्हाला अशी अमेरिका नको आहे. आम्हाला आमची सुरक्षा, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य हवे आहे. त्यामुळे आमच्या लोकशाहीला आणि सुरक्षेला सरकारने हात लावू नये, हँड्स ऑफ!’, अशी भूमिका निदर्शकांनी मांडली आहे. भीतीच्या वातावरणात आमच्या मुलांनी वाढावे, असे आम्हाला वाटत नाही, असेही स्थलांतरितांपैकी एकाने सांगितले. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे असुरक्षितता निर्माण होत असल्याने त्यांच्यावर महाभियोग चालवावा आणि मस्क यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. नव्या सरकारविरोधात इतक्या लवकरच संतापाची लाट उसळल्याने सरकारला धक्का बसला आहे. लोकांच्या संतापावर उतारा म्हणून व्हाइट हाऊसने मात्र एक निवेदन प्रसिद्ध करत सामाजिक सुरक्षा, आरोग्य सेवा याबाबतीत जनतेला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. खूप मोठी लोकसंख्या आजही ट्रम्प यांच्या बाजूने आहे. या लोकसंख्येला आक्रमक अमेरिकावादाची भुरळ पडली आहे. त्यांना ट्रम्प प्रशासनाचे हे म्हणणे सहज पटेल. पण अमेरिकेची निर्मिती आणि विकास यामध्ये ठराविक कुठल्या गटाचा नव्हे तर सगळ्या जगभरातून आलेल्या लोकांच्या विद्वत्तेचा आणि कष्टाचा खूप मोठा वाटा आहे. जगातील सर्वांचे स्वागत या मानवी धोरणाचा ट्रम्प समर्थकांना विसर पडला असावा किंवा समजून दुर्लक्ष करण्याची त्यांची वृत्ती निर्माण झाली असावी. आपल्या देशाला ग्रेट बनवण्यासाठी दुसऱ्यांना त्रास द्यायला ट्रम्प यांना जितकी मजा वाटत आहे त्याच्या कितीतरी अधिक गंभीर परिणाम अमेरिकेवर होणार आहेत याची जाणीव खूप मोठ्या जन समुदायाला झाली आहे. या जनतेचे डोळे खाडकन उघडण्याच्या मागे जनता आपल्या हक्कांबद्दल अधिक जागृत आहे हे आहे. ही खुली लोकशाही सुध्दा आपल्या आक्रमक, अतिरेकी आणि संभ्रम पसरवणाऱ्या धोरणातून संभ्रमित करून त्याला एक वळण देऊ असे वाटणाऱ्यांना हा जोराचा धक्का आहे. ट्रम्प पहिल्यांदा सत्तेवर आले तेव्हापासून असे अविचारी निर्णय घेणारे आणि वादग्रस्त कारभार करणारे अनेक राज्यकर्ते सत्तेवर आले. त्यांच्या चुकीच्या धोरणाचे परिणाम त्या त्या देशात दिसून येत आहेत. पण, ट्रम्प यांचे धोरण याहून खूप व्यापक मात्र जगाच्या पायावर धोंडा पडणारे ठरणार आहे. जगातल्या प्रत्येक राज्यकर्त्याला आपल्या तालावर नाच करायला लाऊ असे जरी वाटले तरी जगातले अनेक देश यातून मार्ग शोधू लागले आहेत. आपल्या गरजा ते अन्य राष्ट्रांशी व्यवहार करून देखील पूर्ण करू शकतात आणि आपली आयात निर्यात सावरू शकतात. अमेरिका यातून एकाकी पडण्याचा धोका अधिक आहे. मित्र राज्यकर्ता धरसोड वृत्तीचा असला की काय फटका बसतो हे युक्रेनचे झेलेन्स्की अनुभवत आहेत. युक्रेनच्या जनतेशी सर्वात मोठा धोका झाला आहे. त्याचे पडसाद युरोपमध्येही उमटणार आहेत. हे जबाबदार व्यक्तिचे निदर्शक नव्हे. हाच धोका वेगळ्या पद्धतीने अमेरिकेत जनता अनुभवत आहे. अमेरिकेच्या तरुणाईला नोकऱ्या हव्या होत्या. पदरात पडली बेरोजगारी, पगार कपात, यांच्या डोक्यावरून आरोग्य योजनांचे शस्त्र हरपण्याचे चिन्ह दिसत आहे. जागतिक व्यापार संधीवर सह्या घेताना आपले धोरण काय होते आणि आज काय आहे? याचा साधा विचारही ट्रम्प करायला तयार नाहीत. परिणामी आंदोलन पेटणार होतेच. ते खूपच लवकर पेटले कारण इथली जनता आपल्या हक्कासाठी जागृत आहे.
Previous Articleआरसीबीने 10 वर्षानंतर भेदला मुंबईचा बालेकिल्ला
Next Article गांजा ओढल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








