रत्नागिरी :
शहर परिसरात रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने गस्तीवर पोलिसांना गोपनीय बातमीच्या आधारे जयस्तंभयेथील खाना खजाना हॉटेलच्या शेजारी अमली पदार्थ ब्राऊन हेरॉईन विक्रीप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अरमान आदिल अशरफ शेख या तरुणास या अमली पदार्थासह रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याची ब्राऊन हेरॉईनची किंमत ७७,५०० रुपये इतकी आहे.
जिल्ह्यात अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालण्याबाबत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार हे ६ एप्रिल रोजी रत्नागिरी शहर परिसरात रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलिंगसाठी रवाना झाले होते. दरम्यान गोपनीय बातमीच्या आधारे दुपारी ३.१० वाजता जयस्तंभ येथील खाना खजाना हॉटेलच्या शेजारी संशयित अरमान आदिल अशरफ शेख हा आपल्या दुचाकी वाहनावर बसून हातात एक पिशवी घेवून संशयित हालचाली करताना दिसला. त्या संशयित आरोपी शेख याची चौकशी करून झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या ताब्यातून एकूण १५ ब्राऊन हेरॉईन अमली पदार्थाच्या पुड्या व इतर साहित्य असे मिळून ७७,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








