कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवडण्यात येणाऱ्या पुरुष गटातील सदस्यपदाची निवडणूक पुढे ढकलली आहे. 11 रोजी विद्या परिषदेच्या (अॅकेडमिक कौन्सिल) बैठकीत निवड करण्यात येणार होती. दरम्यान शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) उमेदवार प्रा. आर. के. निमट यांनी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे उमेदवार प्रा. एस. पी. हंगेरगीकरी यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदविला होता. यावर शनिवारी (5 एप्रिल) कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने, याविषयी कुलपती कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाहीचा निर्णय घेतला. विद्यापीठ प्रशासनाकडून यासंदर्भात आज (दि. 7) कुलपती कार्यालयावर माहिती सादर केली जाणार आहे.
अॅकेडमिक कौन्सिलमधून मॅनेजमेंट कौन्सिलवर निवडण्यात येणाऱ्या महिला गटातील निवडीची प्रक्रिया 11 रोजी होणार आहे. महिला गटातून विकास आघाडीच्या उमेदवार डॉ. मंजिरी मोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. विषयपत्रिकेवर त्यांच्या निवडीचा विषय आहे. अॅकेडमिक कौन्सिलच्या बैठकीत अधिकृतपणे त्यांच्या निवडीची घोषणा होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अॅकेडमिक कौन्सिलमधील जवळपास 55 सदस्य मतदानास पात्र ठरले आहेत.
अॅकेडमिक कौन्सिलमधून मॅनेजमेंट कौन्सिलवर निवडण्यात येणारे सदस्य हे शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करतात. ते थेट शिक्षकातून निवडून आलेले असतात. मात्र प्रा. हंगेरगीकर यांची अॅकेडमिक कौन्सिलमधील नियुक्ती ही स्थायी समितीच्या शिफारशीनुसार झाली आहे. त्यामुळे त्यांना मॅनेजमेंट कौन्सिलसाठीची निवडणूक लढविता येणार नाही अशी हरकत प्रा. निमट यांनी घेतली आहे. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासमोरील सुनावणीतही त्यांनी हाच मुद्दा मांडला. तर प्रा. हंगेरगीकर यांनी विद्यापीठाच्या नियमावलीनुसार आपली निवड झाली आहे. अॅकेडमिक कौन्सिलच्या बैठकाला मी उपस्थिती दर्शविली आहे. कामकाजात सहभाग असल्याने माझ्याबाबत घेतलेला आक्षेप योग्य नाही. निवडणूक लढविण्यास मी पात्र आहे असा युक्तीवाद केल्याचे समजते. कुलगुरू शिर्के यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून याविषयी कुलपती कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 11 एप्रिल रोजी अॅकेडमिक कौन्सिलच्या बैठकीत होणारी पुरुष गटातील निवडणूक पुढे ढकलली आहे. पुरुष गटातील निवडणूक पुढे गेल्यामुळे विकास आघाडीला धक्का बसल्याची चर्चा आहे.








