बैठका वेळेत सुरू होणे दुरापास्त : ज्येष्ठ नगरसेवकांतून नाराजी, विविध विषयांवर चर्चा करण्यास वेळ पडतोय अपुरा
बेळगाव : महापालिकेतील सभांचे गांभीर्य हरवत चालल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नगरसेवक आणि अधिकारी मनमानी पद्धतीने बैठकांच्या वेळा न पाळता उपस्थित रहात आहेत. त्यामुळे विविध विषयांवर सविस्तर चर्चा न करताच घाईगडबडीत वरवरची चर्चा करून सभा उरकल्या जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून उशिराने सभा सुरू होण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्येष्ठ नगरसेवकांकडून अनेकवेळा बोधामृत देऊनही काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर याचा कोणताच परिणाम होताना दिसत नाही.
महापालिकेच्यावतीने सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यासह विविध स्थायी समितींच्या बैठका पार पडतात. बैठकांचे नियोजन कौन्सिल विभागाकडून केले जाते. महापौर-उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या परवानगीवरून बैठकीची वेळ ठरविली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नियोजित वेळेत एकही बैठक सुरू झालेली नाही. स्थायी समिती बैठका ठराविक वेळेपेक्षा तासभर उशिरानेच सुरू केल्या जात आहेत. अनेकवेळा अधिकारी उपस्थित असतात. तर नगरसेवक गैरहजर असतात. यामुळे बैठका सुरू होण्यास विलंब होत आहे. बऱ्याचवेळा तर नगरसेवक असतात पण अधिकारी गैरहजर असतात, असा आंधळा कारभार सध्या महापालिकेत सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याची सूचना केली जाते. पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते की नाही हा मात्र संशोधनाचा विषय आहे. अलीकडेच महापौर मंगेश पवार यांनी शहरातील पाणी समस्येबाबत चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य सभागृहात एलअँडटी आणि केयुआयडीएफसीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. पण बैठकीला काही मोजकेच अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे बैठक रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेली बैठकदेखील वेळेत सुरू झाली नाही.
शनिवारी महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. कौन्सिल विभागाकडून सकाळी 11 वाजता बैठक सुरू होईल अशी नोटीस जारी करण्यात आली. मात्र 11 सोडाच, बैठक तब्बल दोन तासांनी उशिरा म्हणजेच 1 वाजता सुरू झाली. कौन्सिल विभागाच्या अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी व मनपा आयुक्त सभागृहात उपस्थित होत्या. मात्र महापौर व उपमहापौर आणि नगरसेवक मात्र गैरहजर होते. बराच उशीर वाट पाहिल्यानंतर 1 वाजता बैठकीला सुरुवात झाली. त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवक व इतरांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून महापालिका अधिकारी व नगरसेवकांना वेळेचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. बैठका वेळेत सुरू होत नसल्यामुळे विविध विषयांवर चर्चा करण्यास वेळ अपुरा पडत आहे. काही गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून त्यावर निर्णय घेणे गरजेचे असते. मात्र वेळेअभावी साधक बाधक चर्चा करून विषयांना मंजुरी दिली जात आहे. तर काही नगरसेवकांना प्रश्न मांडण्यासदेखील वेळ मिळणे कठीण झाले आहे. शनिवारची सर्वसाधारण बैठक सायंकाळी 6.30 पर्यंत चालली. विषय पत्रिकेवर तब्बल 20 हून अधिक विषय घेण्यात आले होते. त्यामुळे काही विषयांवर हलकी-फुलकी चर्चा करून बैठक गुंडाळली. हा सर्व प्रकार पाहता मनपाला वेळेचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
कौन्सिल सेक्रेटरींची कानउघाडणी
कौन्सिल हे एक पवित्र स्थान असून त्याठिकाणी शिस्तीला महत्त्व आहे. सभागृहात प्रवेश करणाऱ्यांची विचारपूस करूनच त्यांना प्रवेश देणे कौन्सिल विभागाचे काम आहे. मात्र काही जण पत्रकार असल्याचे सांगत सभागृहात प्रवेश करत आहेत. शनिवारच्या बैठकीत एका तोतया पत्रकाराने सभागृहात प्रवेश करून नगरसेवक, अॅड. हनमंत कोंगाली यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत नगरसेवक रवी धोत्रे यांनी कौन्सिल सेक्रेटरीला धारेवर धरले. सभेची माहिती पोलीस खात्याला देण्यात आली आहे का? अशी विचारणा केली. त्याचबरोबर प्रवेशद्वारांवर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती का करण्यात आलेली नाही. नियुक्ती केली असेल तर संबंधितांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी सभागृहात केली.









