1800 नवीन जॉब कार्ड वितरित : हलक्या भाराची कामे मिळणार
बेळगाव : दिव्यांगांना हाताला काम उपलब्ध व्हावे आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी जिल्ह्यातील दिव्यांगांना रोहयोंतर्गत जॉब कार्ड वितरण अभियान राबविण्यात आले आहे. 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 1804 दिव्यांगांना नवीन जॉब कार्ड वितरित करण्यात आली आहेत. त्यामुळे दिव्यांगांना जगण्यासाठी आता रोहयोचा आधार मिळणार आहे. अकुशल कामगारांचा आर्थिक स्तर उंचावावा यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक कामगारांचा यामध्ये समावेश आहे. सद्यस्थितीत 1 लाख 53 हजार 205 कामगार काम करू लागले आहेत. विशेषत: 349 वरून रोहायोंच्या मजुरीत 370 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दरवर्षी नवीन कामगारांची यामध्ये भर पडू लागली आहे. शिवाय दिव्यांगांनाही या योजनेंतर्गत काम उपलब्ध करून दिले जात आहे.
जिल्ह्यात यासाठी अभियान राबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 10819 दिव्यांग रोहयो कामगारांची नोंद आहे. आता नवीन दिव्यांग रोहयो कामगारांची त्यामध्ये भर पडत आहे. विशेषत: या दिव्यांग कामगारांना पाणी देणे, झाडे लावणे व इतर हलक्या भाराची कामे त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार दिली जात आहेत. त्याबरोबर रोहयोंच्या बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे कामही दिव्यांग कामगारांवर दिले जात आहे. शासनाने रोहयोमध्ये दिव्यांग, अंध आणि वयोवृद्धांनाही कामे उपलब्ध करून द्यावीत, असा आदेश दिला आहे. त्यानुसार ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये याची अंमलबजावणी होऊ लागली आहे. त्यामुळे आता रोहयो कामामध्ये दिव्यांगांचाही सहभाग राहणार आहे. या योजनेंतर्गत एका कुटुंबाला 100 दिवस काम देणे आवश्यक आहे. त्याबरोबर दिव्यांगांनाही अधिक दिवस काम देणे बंधनकारक राहणार आहे. उदरनिर्वाहासाठी दिव्यांगांना आता रोजगार हमी योजना आधार ठरणार आहे.
जिल्ह्यात 46 हजारहून अधिक दिव्यांग
जिल्ह्यात 46 हजारहून अधिक दिव्यांगांची संख्या आहे. त्यातील 18 वर्षांवरील इच्छूक दिव्यांगांना जॉब कार्ड वितरित केली जात आहेत. शिवाय रोहयोमध्ये सामावून घेतले जात आहे. दिव्यांगांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.
– रवी बंगारेप्पण्णवर (जि. पं. योजना संचालक)









