नागरिकांची कामे करून देण्यास विलंब झाल्याने नाराजी
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेळगाव तालुका रेकॉर्ड कार्यालयाला अखेर दुरुस्तीचे भाग्य लाभले आहे. भिंतींना रंगरंगोटी करण्यासह कार्यालय हायटेक करण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. मात्र दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे कारण सांगत विविध कागदपत्रांसाठी अर्ज करणाऱ्यांना काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे अर्जदारातून नाराजी व्यक्त केली जात आहे. कचेरी रोडवरील सध्याच्या रेकॉर्ड कार्यालयामध्ये यापूर्वी बेळगाव तहसीलदारांचे कार्यालय होते. मात्र हे कार्यालय जीर्ण झाल्याने तेथील तहसीलदार कार्यालयाचे रिसालदार गल्लीतील महापालिकेच्या जुन्या कार्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. तेव्हापासून जुन्या तहसीलदार कार्यालयात भूमी आणि रेकॉर्ड रुम सुरू आहे.
त्याठिकाणी मिळकती संबंधीचे जुने रेकॉर्ड दिले जाते. त्याचबरोबर सातबारा उताऱ्याचेही वितरण केले जात होते. पण अलीकडेच भूमी कार्यालयही तहसीलदार कार्यालयातच हलविण्यात आले आहे. तेव्हापासून जुन्या तहसीलदार कार्यालयात केवळ रेकॉर्ड रुम कार्यरत आहे. मालमत्ता संदर्भातील जुनी कागदपत्रे हवी असल्यास रेकॉर्ड कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर जुने दस्ताऐवज तपासून संबंधितांना त्याची झेरॉक्स प्रत उपलब्ध करून दिली जाते. मात्र या कार्यालयाची इमारत अत्यंत जुनी असल्याने ती जीर्ण झाली होती. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून रंगरंगोटीसह इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. पण दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगत विविध कागदपत्रांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या नागरिकांना काही दिवसांनी येण्यास सांगितले जात आहे.









