दरवाढ त्वरित मागे घेण्याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
खानापूर : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने पेट्रोल, विद्युत दरात प्रचंड वाढ केल्याने सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. ही लादलेली दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका भाजपतर्फे तहसीलदारार्फंत राज्यपालाना देण्यात आले आहे. निवेदनाचा स्वीकार ग्रेड टू तहसीलदार राकेश बुवा यांनी करून राज्यपालाना निवेदन पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.
खानापूर तालुका भाजपतर्फे काँग्रेस सरकारकडून वाढवण्यात आलेल्या पेट्रोल, अन्नधान्य, दूध, बस भाडे, वीज दर आणि मुंद्राक शुल्क यासह इतर वस्तूंचेही दर प्रचंड प्रमाणात वाढवले आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनावर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. यासाठी काँग्रेसने केलेली दरवाढ त्वरित मागे घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुका भाजपाध्यक्ष बसवराज सानिकोप, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, संजय कुबल, धनश्री सरदेसाई, बाबुराव देसाई, सदानंद पाटील, पंडित ओगले यांची भाषणे झाली. यावेळी मल्लाप्पा मारिहाळ, राजेंद्र रायका, प्रशांत लक्केबैलकर, सुरेश देसाई, भरमाणी पाटील, गुंडू तोपिनकट्टी यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









