पालकमंत्री जारकीहोळी यांचे प्रतिपादन : पुरस्कार वितरण समारंभ
बेळगाव : शिक्षण आणि आरेग्याला सरकारसह सर्वांनीच प्राध्यान्य देणे गरजेचे आहे. विद्यावंत समाज निर्माणात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहेळी यांनी केले. राज्य सरकारी कर्मचारी संघावर दुसऱ्यांदा राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सी. एस. षडाक्षरी यांचा सत्कार व आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बेळगाव तालुक्यातील शिक्षिकांसाठी गुरुस्पंदन आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन येथील महात्मा गांधी भवनात रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन करून पालकमंत्री जारकीहोळी बोलत होते. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत 10 ते 15 शाळा इमारती उभारण्यासाठी अनुदान देण्यात आले आहे. आता शिक्षक संघटनेने सरकारला सल्ला-सूचना वेळोवेळी दिल्यास अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणे सरकारला अनुकूल होणार आहे. उत्कृष्ट शिक्षिकांना देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या नावे पुरस्कार देणे उचित ठरेल, असा सल्लाही याप्रसंगी पालकमंत्र्यांनी दिला.
राज्य सरकारी कर्मचारी संघावर दुसऱ्यांदा राज्य अध्यक्षपदी निवड झालेले सी. एस. षडाक्षरी यांचा सत्कार करताना आपणाला आनंद होतो आहे. चिकोडी येथील सरकारी कर्मचारी संघासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पुढील दिवसात आणखी 2 कोटी रुपये देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सरकारी कर्मचाऱ्यांनी राजकीय क्षेत्रात आले पाहिजे. समाज विद्यावंत व्हावा, अशी कळकळ असल्यास बुद्ध, बसव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवून राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यास राज्य आणि देश प्रगतीपथावर जाईल, यात शंका नाही, असे याप्रसंगी ते म्हणाले. कार्यक्रमात बेळगाव तालुक्यातील 54 शिक्षिकांना गुरुस्पंदन आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आमदार असिफ सेठ, राज्य कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष बसवराज रायव्वगोळ, बेळगाव शिक्षण खात्याच्या उपसंचालिका एल. एस. हिरेमठ, गिरीगौडा एच., मल्लिकार्जुन बळ्ळारी, एस. बसवराजू, एस. पी. दासप्पन्नावर, रवी बजंत्री आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.









