राधानगरी :
राधानगरी जंगल परिसरातील अभयारण्य क्षेत्रात आढळणाऱ्या दुर्मिळ वृक्षांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत आणि पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वृक्षांना क्यूआर कोड लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राधानगरी धरण कृती समितीचे अध्यक्ष व बिद्रीचे माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी यांनी याबाबत मागणी केली आहे.
नंदकिशोर सूर्यवंशी म्हणाले, राधानगरीच्या जंगलात अनेक दुर्मिळ वृक्ष आहेत, ज्यांच्याबद्दल जाणकार वगळता इतरांना फारशी माहिती नसते. जर या झाडांवर क्यूआर कोडच्या पाट्या लावल्या गेल्या, तर मोबाईलने स्कॅन केल्यावर त्यांची प्रचलित आणि शास्त्रीय नावे तसेच विकिपीडियाच्या माध्यमातून सखोल माहिती उपलब्ध होईल.
यामुळे जैवविविधतेबद्दल जागरूकता वाढेल आणि पर्यावरण तसेच पर्यटन विकासालाही चालना मिळेल.सूर्यवंशी यांनी कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल परिसरातील झाडांना सार्वजनिक बांधकाम विभागाने (उद्यान) लावलेल्या क्यूआर कोड उपक्रमाचा उल्लेख केला. त्याच धर्तीवर राधानगरीमध्येही हा उपक्रम राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
क्यूआर कोडमुळे पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना दुर्मिळ वनस्पतींची ओळख करून घेणे सोपे जाईल. तसेच, या माहितीमुळे लोकांना पर्यावरणाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजेल, असा विश्वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. आता या मागणीवर वन विभाग आणि स्थानिक प्रशासन काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.








