कोल्हापूर / सुधाकर काशीद :
नेता आला, प्रमुख पाहुणा आला, त्याचे फुल देऊन स्वागत. अगदीच लाडका नेता असेल तर फुलांच्या पायघड्या, फुलांचा वर्षाव ठीक आहे. पण जेसीबी भरून, तोही एकच जेसीबी नव्हे तर, पाच–पन्नास जेसीबी रांगेने भरून फुलांची उधळण करणे.., ट्रॉलीभर चंदेरी कागदांच्या तुकड्यांचा वर्षाव करणे, हा सुरू झालेला स्वागताचा प्रकार सर्वसामान्य नागरिकांना थक्क करून जाणारा आहे.
जेसीबीने गुलाल उधळणं हा प्रकार तर सुरू झाला आहेच. एकाने केले म्हणून दुस्रऱ्याने तसे करणे, असे त्याचे स्वरूप आहे आणि आता जेसीबी भरून फुलांची उधळण आणि चंदेरी, रंगीबेरंगी कागदांच्या तुकड्यांचा वर्षाव अशा नव्या एका जल्लोषाची सुरुवात झाली आहे.
फुले म्हणजे प्रसन्नतेचे प्रतीक. पण त्याचा असा स्वागतासाठी दीडशेच्या टनाने वापर आणि क्षणात चुराडा सुरू आहे. हा वापर इर्षेबाज कार्यकर्त्यांकडून थांबणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे ‘मला नको असले स्वागत’, असे स्पष्ट म्हणणाऱ्या नेत्याचीच या क्षणाला मोठी गरज आहे.
नेत्यांचे स्वागत हा सार्वजनिक समारंभातला अनिर्वाय भाग आहे. नेत्यांचे आगमन झाले, की फटाक्यांची कडकडणारी माळ, कडाडणारी हलगी, दीर्घ सुराचे रणशिंग, चौकात स्वागताचे फलक हा झाला पारंपरिक भाग. एखाद्या नेत्याने समाजासाठी, गावासाठी, परिसरासाठी केलेल्या कामाबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी असे स्वागत केले तर ते क्षणभर मान्यच. कारण समाजासाठी दीर्घकाळ लाभाचे काम नेत्यांकडून झालेले असते आणि त्याबद्दलचे समाधान व्यक्त करण्यासाठी तसेच स्वागत होणे अपेक्षित असते. पण आता जेसीबी भरून गुलाल, जेसीबी भरून फुले, क्रेनच्या यारीने घालावा लागेल इतका मोठा हार ही नवी पद्धत रूढ झाली आहे. त्यासाठी होणारा खर्च किंवा कोणाच्यातरी गळ्यात घातलेला खर्च सामान्य माणसाच्या कल्पनेबाहेरचा आहे. त्या खर्चात पाच–दहा जणांचे कुटुंब उभे करता येणे, गावात पाण्यासाठी एखादी विहीर काढून देता येणे नक्कीच शक्य आहे.
पण परिस्थिती बदलली आहे वरच्या पातळीवरील इर्षेच्या राजकारणाचे पडसाद जिल्हा, तालुकापातळीवर उमटू लागले आहेत. ‘चहापेक्षा किटली गरम’ असेच काही कार्यकर्ते गाव, तालुका, जिल्हापातळीवर आहेत. त्यांच्या रोमारोमात ही इर्षा भिनली आहे आणि आपल्या नेत्यांच्या स्वागतासाठी नव्हे तर, आम्ही आमच्या नेत्यांचे स्वागत कसे करतो, हे जिल्हा पातळीवरील विरोधकांना दाखवण्यासाठी प्रचंड खर्च केला जात आहे. त्याचा एक भाग म्हणजे जेसीबी भरून गुलाल, जेसीबी भरून फुलांची उधळण.., हा प्रकार आहे. ‘आमचे स्वागत जेसीबीभर गुलाल, फुलांनीच झाले पाहिजे’, असे नेता सांगत असण्याची शक्यता खूप कमी आहे. पण स्वागत तेही इर्षेबाज.., असली भावना कार्यकर्त्यांत अधिक ताकतीने वाढीस लागली आहे.
आज सत्तेवर असलेले हे ताकदीने करत आहेत. पण उद्या सत्तेवर दुसरे कोणी आले तर ते असे करणार नाहीत, असे म्हणणेही धाडसाचे होणार आहे. कारण इर्षेच्या सध्याच्या राजकारणात आपण पुर्वी कोणत्या पक्षात होतो? मध्येच कधी आपण तो पक्ष सोडला? त्यानंतर आता कोणत्या पक्षात आपण आहोत, असला विचार करणे नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सोडून दिले आहे. केवळ तालुका, जिल्हा पातळीवरची व्यक्तिगत राजकीय ईर्षा त्यांच्यात भिनली आहे आणि कितीही खर्च होऊ दे.., बेहत्तर, ट्रकभर गुलाल आणि जेसीबीची रांगच्या रांग लावून फुले उधळणार, असली भाषा सुरू झाली आहे. ती संधी मिळाली की प्रत्यक्षात उतरत आहे आणि सामान्य माणूस हे सारे पाहून अक्षरश: थंडगार पडला आहे.
कोणाबद्दल काय बोलायचे, कशाला वाईटपणा घ्यायचा, अशा मन:स्थितीत सामान्य माणूस आहे.
- इर्षा विकासाची असावी.पैशाच्य ताकदीची नको
गेल्या 50 वर्षातले राज्यातले आणि जिह्यातले राजकारण माझ्या डोळ्यासमोर आहे. राजकारणातले अनेक चढ–उतार मी पाहिले आणि अनुभवले. पण या सर्व काळात राजकीय चढाओढीची एक मर्यादा होती. आता मात्र या राजकीय चढाओढीचे रूपांतर अगदी तीव्र अशा इर्षेत झाले आहे आणि आपली इर्षा दाखवण्यासाठी बळाचा आणि पैशाचा वापर वाढला आहे. अमुक एक सरकार सत्तेवर आहे म्हणून मी हे म्हणत नाही. पण या वातावरणाचा खूप मोठा विचित्र परिणाम देशाच्या लोकशाहीवर होणार आहे. राजकीय मिरवणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या ताकतीचे प्रदर्शन नव्हे तर पैशाचे प्रदर्शन केले जात आहे. कोणी त्याच्या विरोधात ठामपणे बोलायलाही उभारत नाही, अशी दहशतही आहे. आपण राजकारण म्हणजे काय करता। याचे एकदा सर्वच कार्यकर्त्यांनी चिंतन करणे गरजेचे आहे. मिरवणुकांत गुलाल क्षणभर ठीक आहे, पण ट्रकभर गुलाल, ट्रकभर फुले, ट्रकभर रंगीबेरंगी कागदाचे तुकडे उधळणे म्हणजे राजकीय ईर्षा कोणत्या टोकाला पोहोचली, याचेच वास्तव आहे.
– सुरेश शिपुरकर, ज्येष्ठ राजकीय, सामाजिक कार्यकर्ते








