वृत्तसंस्था/ किंग्जस्टन (जमैका)
येथे सुरु असलेल्या नोव्हेल सर्किटच्या ग्रँडस्लॅम ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धेत ब्रिटनचा धावपटू मॅथ्यू हडसन-स्मिथ हा पुरुषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत जेतेपद पटकाविले. ग्रँडस्लॅम ट्रॅक्स स्पर्धेतील हडसन स्मिथ हा पहिला चॅम्पियन धावपटू ठरला आहे.
मॅथ्यू स्मिथने 200 मी. धावण्याच्या शर्यतीत 20.77 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद पटकाविले. तर शुक्रवारी या स्पर्धेत त्याने पुरुषांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीतील विजेतेपद मिळविले होते. या कामगिरीमुळे हडसन स्मिथने एकूण 20 गुण पटकाविले. या कामगिरीमुळे हडसन स्मिथला 1 लाख अमेरिकन डॉलर्सचे रोख बक्षीस मिळाले.
महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या केनी बेडनेरेकने 20.07 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान मिळविले. अमेरिकेची बेडनेरेक हिने यापूर्वी दोन वेळेला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविले होते. पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये ब्रिटनच्या झिमेल ह्युजेसने विजेतेपद पटकाविले. अमेरिकेचा माजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा धावपटू तसेच 4 वेळेला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविणारा मॅकेल जॉनसनने अशा प्रकारची स्पर्धा पहिल्यांदाच भरविली आहे. पुरुष आणि महिलांच्या विभागातील अॅथलेट्ससाठी कमी तसेच दीर्घ पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यती आयोजित केल्या होत्या. सदर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 200 मी. धावण्याच्या शर्यतीमधील ऑलिम्पिक चॅम्पियन गॅबी थॉमस तसेच 400 मी. अडथळ्याच्या शर्यतीमधील विश्वविक्रमी सिडनी लेव्हरोन यांनी विविध पल्ल्यांच्या शर्यतीत पहिले स्थान मिळविले. महिलांच्या विभागात ऑलिम्पिक चॅम्पियन गॅबी थॉमसला या स्पर्धेत ग्रँडस्लॅम चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आले. महिलांच्या कमी पल्ल्याच्या गटामध्ये इथोपियाच्या वेल्टजेने 1500 मी. धावण्याची शर्यत जिंकली.









