प्रतिनिधी/ सातारा
लढवय्या संपादक, आंदोलक, संकल्पक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले तरुण भारतचे सल्लागार संपादक तसेच लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक डॉ. किरण ठाकुर यांचा अभीष्टचिंतन सोहळा राजधानी साताऱ्यात साजरा होत आहे. त्यानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रशस्त मैदानावर भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा सोमवार दि. 7 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यानिमित्त स्वरधारा हा जुन्या नव्या गीतांचा कार्यक्रम तसेच रणवाद्य कल्लोळ हा पारंपारिक वाद्यांचा अनोखा अविस्मरणीय अनुभव सातारकरांना अनुभवायास मिळणार आहे. यावेळी डॉ. किरण ठाकुर विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतक, सातारकरांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
डॉ. किरण ठाकुर यांच्या 73 व्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्ताने राजधानी साताऱ्यात यावर्षी अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 4 एप्रिलपासून भव्य दिव्य अशा या सोहळ्याला प्रारंभ झालेला असून पहिल्याच पुष्पात रेकार्डब्रेक अशी गर्दी झाली होती. राजधानी साताऱ्याच्या तरुणाईने शिवविचारांचे द्रोण प्रा. नितीन बानुगडे पाटील आणि मोहन शेटे यांच्या व्याख्यानातून घेतले गेले. त्या कार्यक्रमानंतर रविवारी झालेल्या ‘गीतरामायण’ या कार्यक्रमास सुद्धा सातारकरांनी भरभरुन दाद दिली. गीत रामायणाच्या कार्यक्रमामध्ये संगीतबद्ध अशा स्वरुपात गीत रामायण ऐकताना सातारकर मंत्रमुग्ध होवून गेले होते.
डॉ. किरण ठाकुर यांच्या वाढदिवसाचा मुख्य सोहळा दि. 7 रोजी होत आहे. त्या सोहळ्याची जय्यत तयारी सोहळा समितीच्यावतीने करण्यात आली आहे. राजधानी साताऱ्यातल्या जिल्हा परिषदेच्या भव्य दिव्य शामियाना उभारण्यात आलेला आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी 8 वाजता संगममाहुली येथे कृष्णा वेण्णा संगमावर विवेकशास्त्री गोडबोले यांच्या हस्ते डॉ. किरण ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त लघुरुद्र सोहळा होणार आहे. यावेळी ब्रम्हवृंद तसेच 50 दाम्पत्यांना महाप्रसादही दिला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी जिल्हा परिषदेतील भव्य शामियान्यात सायंकाळी 5 वाजता हलगी वादन व तुतारीच्या निनादात डॉ. किरण ठाकुर मामा यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याप्रसंगी मंत्रपठण होणार असून 73 महिलांकडून 73 दिव्यांनी डॉ. किरण ठाकुर यांचे औक्षण केले जाणार आहे. यानंतर साताऱ्याची ओळख असलेले गजीनृत्य सादर केले जाणार आहे.
याप्रसंगी डॉ. किरण ठाकुर आपले मनोगत व्यक्त करत सातारकरांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर अभीष्टचिंतन सोहळा सुरू होणार असून सर्व क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, वाचक, सातारकर आदींच्या मामा शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये शिस्तबद्ध असे नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. वाहन तळाची सोय, वाहनातून उतरलेल्या प्रत्येक मान्यवरांचे सातारी पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात ज्या ज्या व्यक्ती, संस्था उत्कृष्ट काम करतात त्यांचाही सत्कार डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सोहळ्याला प्रत्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीनकाका पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह जिह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह जिल्ह्यातील, राज्यातील राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मामांना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम भव्य दिव्य असा होणार आहे.
स्वरधारा अन् रणवाद्य कल्लोळ
डॉ. किरण ठाकुर वाढदिवस सोहळा समितीच्यावतीने अतिशय नेटके नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वरधारा हा ऋषिकेश रानडे आणि मधुरा दातार यांचा नव्या जुन्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच मंदार परळीकर व सहकलाकार यांच्यावतीने पारंपारिक वाद्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.








