शुभेंदु अधिकारी यांच्याकडून शिलान्यास
वृत्तसंस्था/ नंदिग्राम
पश्चिम बंगालच्या नंदिग्राम जिल्ह्यात अयोध्येसारखे भव्य राम मंदिर उभारणीचे काम रामनवमीच्या तिथीपासून सुरू झाले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी रविवारी रामनवमीच्या दिनी नंदिग्राममध्ये मंदिर उभारणीसाठी आधारशिला ठेवली आहे. सोनाचूरा गावात हे मंदिर उभारले जाणार आहे. सोनाचूरा गावात 6 जानेवारी 2007 रोजी स्थानिक प्रशासनाच्या भूमी अधिग्रहणाला विरोध करणाऱ्या 7 जणांचा गोळीबारात मृत्यू झाला होता.
समर्थक आणि भक्तांच्या ‘जय श्रीराम’ जयघोषादरम्यान अधिकारी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले आहे. यापूर्वी भाजप नेता रामनवमी शोभायात्रेचे नेतृत्व करत सोनाचूरा येथील शहीद मीनारपासून प्रस्तावित मंदिर स्थळी पोहोचला होता. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चालू महिन्याच्या अखेरीस पूर्व मेदिनीपूर जिल्ह्dयातील दीघा येथे जगन्नाथ मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.
सोनाचूर येथील राम मंदिर दीड एकर भूभागावर उभारले जाणार आहे. तर या मंदिराचे डिझाइन अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवरच केले जाणार आहे. हे मंदिर पश्चिम बंगालमधील सर्वात मोठे राम मंदिर असणार आहे. पश्चिम बंगालमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणावर रामनवमीचा सण साजरा करण्यात आला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात लाखो लोकांनी भाग घेतला आहे. तर यावेळी सरकारकडून मोठा बंदोबस्त ठेवत कायदा-सुव्यवस्था राखण्याची तयारी करण्यात आली होती.









