कोल्हापूर :
जिह्यातील नगर भूमापन अधिकारी कार्यालयात ‘भू प्रणाम केंद्र‘ स्थापन करण्यात आले आहे. यासह राज्यातील 20 केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी 4 एप्रिल रोजी महसूल मंत्री चंद्रकांत बाबनकुळे यांच्या उपस्थितीत ऑनलाइनने झाले. या केंद्रामुळे कोल्हापूर जिह्यातील नागरिकांना भूमि अभिलेख विभागाच्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
भूमि अभिलेख विभाग आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असून संपूर्ण भारतात महाराष्ट्र राज्याने या क्षेत्रात अग्रगण्य स्थान पटकावले आहे. या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून भू प्रणाम केंद्र आहे. कोल्हापूर येथील नगर भूमापन अधिकारी कार्यालयाच्या इमारतीत स्थापन झालेले हे केंद्र निविदा प्रक्रियेद्वारे खासगी एजन्सीमार्फत कार्यान्वित केले जाणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या विहित दरांनुसार नागरिकांना या केंद्रातून सेवा मिळणार आहेत. या सुविधांमुळे नागरिकांना भूमि अभिलेखांशी संबंधित कामे जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने करता येतील.
या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यास. शिवाजी भोसले जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, शशिकांत पाटील, नगर भूमापन अधिकारी, आदी, उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रकांत बाबनकुळे यांनी या केंद्राच्या स्थापनेमुळे नागरिकांना मिळण्राया सुविधांचे कौतुक केले आणि महाराष्ट्राच्या आधुनिकीकरणातील कोल्हापूरच्या योगदानावर प्रकाश टाकला.
- कोल्हापूर राज्यात टॉपवर
भूमि अभिलेखांच्या आधुनिकीकरणात महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली आहे. कागदपत्रांचे डिजिटलायझेशन, ऑनलाइन सेवा आणि नागरिककेंद्रित सुविधा यामुळे राज्य सरकारने प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणली आहे. कोल्हापूर येथील ‘भू प्रणाम केंद्र‘ हे या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील ‘भू प्रणाम केंद्र‘शी संपर्क साधावा. या केंद्रामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळतील, ज्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होईल.
शिवाजी भोसले, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख
- भू प्रणाम केंद्रातून मिळणाऱ्या सेवा
–मिळकत पत्रिका
–फेरफार नोंदवहीचा उतारा
–परिशिष्ट अ
–परिशिष्ट व
–नमुना नंबर 9 ची नोटीस
–नमुना 12
–अर्जाची पोहच
–रिजेक्शन पत्र
–त्रुटी पत्र
–निकाली पत्र
–विवादग्रस्त नोंदवहीचा उतारा
–अपील निर्णयाची प्रत
–संगणकीकृत नगर भूमापन नकाशा
–ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा
–सर्व प्रकारचे मोजणी अर्ज
–स्कॅन अभिलेख








