विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी
आचरा प्रतिनिधी
संस्थानी थाटाकरिता प्रसिद्ध असणाऱ्या आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा रामनवमी उत्सव रविवारी दि. 6 एप्रिल रोजी शाही थाटात साजरा होणार आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवा निमित्त रामेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानचे सर्व मानकरी, देवसेवक, नोकर-चाकर, महालदार, विश्वस्त मंडळ हा उत्सव दिमाखात पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.या उत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, बेंगलोर येथील श्री रामेश्वर भक्तगण आचरे येथे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गुढीपाडव्या पासून रामेश्वर मंदिरात भक्तांची रिघ लागली होती. गुढीपाडवा ते लळीतापर्यंत अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात रघुपती मुर्तीची पूजा, रोज दुपारी रघुपतीची आरती, सायंकाळी दरबारी प्रख्यात गायकांचा गायनाचा कार्यक्रम व रात्री उशिरा शाही लवाजम्यासह पालखी मिरवणूक सोहळा व कीर्तन होणार आहे.
विविध संगीत कार्यक्रमांची मेजवानी
रविवार दि. ०६ एप्रिल रोजी रामनवमी दिवशी रामजन्माचे कीर्तन – श्री. मिलिंद बुवा कुळकर्णी (रामदासी) (रा.सांगली) सायंकाळी ६ वा. गायक श्री. समीर अभ्यंकर (ठाणे-मुंबई) संवादिनी- श्री. प्रसाद शेवडे,तबला साथ- श्री. रामकृष्ण करंबेळकर. यांचे गायन होणार आहे. सोमवार दि. ०७ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वा. गायिका कु. स्वरांगी गोगटे (आचरा)सायं. ०६.०० वा. गायिका कु.संपदा दुखंडे (आचरा) यांचे गायन होणार आहे. शुक्रवार दि. 11 एप्रिल २०२५ हनुमान जयंती उत्सव.राम गीतावर आधारित भव्य खुली एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे. शनिवार दि. १२ एप्रिल रोजी पहाटे पालखी नंतर श्री हनुमान जन्म. त्यानंतर हनुमान जन्माचे कीर्तन श्री.मिलिंद बुवा कुळकर्णी (रामदासी) (सांगली) करणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन इनामदार रामेश्वर संस्थान कसबा आचरे देवस्थान कमिटी अध्यक्ष प्रदीप प्रभूमिराशी, सचिव संतोष मिराशी व सर्व समिती सदस्यांनी केले आहे.









