कोल्हापूर / कृष्णात चौगले :
अर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याभोवती सावकारी पाश आवळत चालला आहे. सावकाराच्या जाचाने अनेक नागरीकांसह त्यांच्या कुटुंबीयाचे जीवन असह्य बनले असून काहींनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. तर अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तरीही संबंधित सावकारांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे सांगा आता न्याय कोणाकडे मागायचा ? असा यक्षप्रश्न पीडित कुटूंबियांकडून उपस्थित केला जात आहे. जिह्यात 327 नोंदणीकृत खासगी सावकार असले तरी अवैधरित्या धंदा करणारे हजारो सावकार आहेत.
सावकाराच्या त्रासामुळे करवीर तालुक्यातील हलसवडे येथील नागोंडा पाटील या शेतकऱ्यांने शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिट्टी लिहून त्यामध्ये दोन खासगी सावकारांची नावे दिली आहेत. गेल्या काही महिन्यांत सावकारी छळापासून मुक्ततेसाठी अशाप्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनाही ताज्या आहेत. बेकायदेशीरपणे खासगी सावकारीचा धंदा बिनदिक्कतपणे सुरु असून त्याला सहकार विभागासह पोलीस प्रशासनाची मूक संमती असल्याचे चित्र आहे. प्रतिमहिना 5 ते 20 टक्क्यांपर्यंत असलेल्या व्याजदरामुळे सावकाराला अवघ्या काही महिन्यातच दामदुप्पट रक्कम द्यावी लागत आहे. त्यामुळे सावकाराकडून होणाऱ्या त्रासाविरोधात नेमकी दाद कुठे मागायची ? असा प्रश्न संबंधित पिडीतांसमोर उभा राहिला आहे. गरजेपोटी घेतलेले कर्ज हे अनेक व्यक्तींच्या मरणाचे कारण बनले आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाने खासगी सावकारीविरोधात व्यापक मोहिम हाती घेऊन सावकारांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा तक्रार अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून केले जाते. अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या उद्देशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी जिल्हास्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत. तर जिल्हा पोलीस प्रमुख हे सदस्य आहेत. समितीचे सदस्य सचिव हे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक आहेत. त्यामुळे या समितीने खासगी सावकारांवर कडक कारवाई केली तरच सावकारांच्या दहशतीखाली असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अन्यथा सावकारीच्या ओझ्याखाली दबलेल्या नागरिकांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही.
- कुटूंब दहशतीखाली
जिह्यात गेल्या काही महिन्यांत खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतर आजही त्यांचे कुटूंब सावकाराच्या दहशतीखाली जगत आहे. आत्महत्येदरम्यान अनेक नागरीकांनी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबत चिट्टी लिहून ठेवल्याच्या घटना आहेत. त्यामुळे संबंधित सावकारावर कारवाई करण्यासाठी हा पुरावा पोलीस प्रशासनाला पुरेसा आहे. तरीही अनेक पोलीस ठाण्यामध्ये सावकाराशी हातमिळवणी करून पिडीत कुटूंबाला सावकाराविरोधातील कारवाई मागे घेण्यास भाग पाडले असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे ‘कुंपणच जर शेत खात असेल तर दाद मागायची कोठे‘
अशी स्थिती सर्वसामान्य नागरीकांची झाली आहे.
- न्यायासाठी झिजवावा लागत आहे प्रशासनाचा उंबरठा
महिन्यातील प्रत्येक लोकशाही दिनात खासगी सावकाराविरोधात तक्रारी येतात. पण त्यामधील किती तक्रारी योग्यरित्या निर्गत झाल्या, आणि किती तक्रारदारांना न्याय मिळाला हा संशोधनाचा विषय बनला आहे. गेल्या काही लोकशाही दिनात सावकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारी तक्रारादारांचे म्हणणे जाणून न घेताच एकतर्फी निकाली काढल्या आहेत. त्यामुळे संबंधित पिडितांना न्यायासाठी पुन्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
- 72 अवैध खासगी सावकारांवर धाड
अवैध सावकारीच्या अनुषंगाने सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयाने गेल्या दोन वर्षात 72 सावकारांवर धाडी टाकल्या आहेत. त्यापैकी 21 सावकारांवर गुन्हा नोंद केला असून 2 सावकारांची चौकशी सुरु आहे.
- कलम 31 प्रमाणे सावकाराने आकारावयाच्या व्याज दराची मर्यादा
शेतकऱ्यांनी सावकाराकडून तारण कर्ज घेतल्यास त्यावर वार्षिक 9 टक्के व्याज दर घेणे अपेक्षित आहे. तर बिगरतारणावर 12 टक्के व्याज घेणे आवश्यक आहे. तसेच बिगर शेतकरी व्यक्तीकडून तारणावर 15 टक्के व्याज तर बिगर तारणावर 18 टक्के व्याज घेणे अपेक्षित आहे. पण अवैधरित्या खासगी सावकारी करणाऱ्यांकडून प्रतिमहिना 10 ते 20 टक्केंपर्यंत व्याजाची आकारणी केली जात आहे.
- अवैध खासगी सावकारांविरोधात तक्रार आल्यास कारवाई निश्चित
भरमसाठ व्याजदर आकारणाऱ्या अवैध खासगी सावकारांविरोधात जिह्यातून तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची चौकशी करून तत्काळ कारवाई केली जाईल. सावकारांकडून त्रास होत असलेल्या नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी दाखल कराव्यात. आत्महत्येसारखा चुकीचा पर्याय निवडू नये.
निळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था
- नोंदणीकृत सावकारांची संख्या (मार्च 2025 अखेर)
तालुका सावकार संख्या
कोल्हापूर शहर 167
हातकणंगले 87
करवीर 32
गडहिंग्लज 07
शिरोळ 02
कागल 05
भुदरगड 07
आजरा 02
शाहूवाडी 04
राधानगरी 03
चंदगड 02
पन्हाळा 09
एकूण 327








