वृत्तसंस्था / लंडन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली स्टोन याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याला आगामी होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इंग्लीश कौटी क्रिकेटमध्ये 31 वर्षीय स्टोन नॉटिंगहॅमशायर क्लबचे प्रतिनिधीत्व करत असून या संघाने अबुधाबीच्या दौऱ्यावर काही सामने आयोजित केले होते. या सामन्यात खेळताना स्टोनच्या उजव्या पायाच्या गुडघ्dयाला दुखापत झाली आहे. ही दुखापत बरी होण्यास बराच कालावधी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितल्याने स्टोनला जून महिन्यात होणाऱ्या भारताबरोबरच्या कसोटी मालिकेला मुकावे लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून हेडिंग्ले येथे प्रारंभ होत आहे. भारताचा इंग्लंड दौरा 4 ऑगस्टला संपणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघात स्टोन हा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज होता. पण त्याच्या दुखापतीमुळे इंग्लंड संघाला बदली गोलंदाजाचा शोध घ्यावा लागेल. ओली स्टोनने आतापर्यंत 17 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. इंग्लंडचा आणखीन एक वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीने जायबंदी झाल्याने तो भारताविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची शक्यता दुरावली आहे.









