वृत्तसंस्था / ब्युनोस आयरीस (अर्जेंटिना)
2025 च्या आंतरराष्ट्रीय नेमबाजीत क्रीडा फेडरेशनच्या (आयएसएसएफ) विश्व चषक नेमबाजी हंगामाला येथे सुरू झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीच्या अंतिम फेरीत भारताचे नेमबाज वरुण तोमरला पाचवे तर रवींद्र सिंगला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत गुरुवारी वरुण तोमर आणि रवींद्र सिंग यांनी पात्रता फेरीमध्ये समान 580 गुण नोंदवित अनुक्रमे सातवे आणि आठवे स्थान अंतिम फेरीसाठी मिळविले होते. अंतिम फेरीमध्ये 8 नेमबाजांचा समावेश होता. भारताचा सौरभ चौधरी याला पात्रता फेरीमध्ये 16 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 577 गुण नोंदविले. या स्पर्धेमध्ये स्किट नेमबाजीलाही प्रारंभ झाला असून महिलांच्या स्कीट नेमबाजीत भारताच्या रेझा धिल्लाँने 25 पैकी 25 गुण नोंदवित पुढील फेरीसाठी पात्र ठरली आहे. शुक्रवारी येथे उशीरा पुरुष आणि महिलांची 50 मी. रायफल 3 पोझिशन अंतिम फेरी होणार आहे. पुरुषांच्या व महिलांच्या 3 पी नेमबाजी प्रकारात भारताचे ऑलिम्पिक नेमबाज चेन सिंग, ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर, नीरजकुमार तसेच सिप्ट कौर समरा आणि श्रेयांका सदनगी तसेच आशी चोक्सी भाग घेणार आहेत. त्याच प्रमाणे महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी पात्र फेरी टप्प्यात भारताचे मनु भाकर, सिमरनप्रित कौर ब्रार, इशा सिंग सहभागी होत आहेत.









