आटपाडी :
आटपाडी तालुक्यात दोन दिवसापूर्वी ऐकू आलेला गूढ़ आवाज भूकंपाचा असल्याचा कयास वर्तविला जात असतानाच आटपाडीमध्ये गुरूवारी सकाळी अकरा वाजून २२ मिनिटांच्या सुमारास गूढ़ आवाजासह भूकंपाचा हलका धक्का जाणवला. भूकंपाचे केंद्र सांगोला असल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने स्पष्ट केले असून त्या सांगोल्याच्या सीमावर्ती तालुक्यातही भूकंपाची नोंद झाली आहे.
आटपाडी तालुक्यात दोन दिवसापुर्वी मोठा गूढ़ आवाज झाला. सदरचा गुढ आवाज आटपाडीपासून सांगोला, मंगळवेढा तालुक्याच्या सिमेपर्यंत एकाचवेळी ऐकू आला. परंतु तो आवाज कशाचा? याबाबत तर्कवितर्क वर्तविला जात होता. त्यातच गुरूवारी सकाळी ११ वाजुन २२ मिनीटांच्या सुमारास तोच गूढ आवाज आटपाडी शहरासह परिसरात ऐकू आला. त्यावेळी काहीक्षण धरती हलल्याचा धक्का जाणवला.
दुपारपर्यंत ही घटना भूकंपाची आहे, याची कल्पना सकाळी आटपाडीमध्ये तो गूढ आवाज आणि हादरा अनुभवणाऱ्यांना नव्हती. परंतु दुपारी सांगोला येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे व तेथे २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदविला गेल्याची माहिती खुद्द राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने जाहीर केल्यानंतर आटपाडीसह सांगोला तालुक्यात भूकंप झाल्याचे स्पष्ट झाले.
आटपाडीप्रमाणेच लगतच्या सांगोला तालुक्यातील कटफळ, महुद, नाद्वारे, वाटंबरे, कोळा परिसरातही सकाळी गुढ आवाज आणि नकळत भूकंपाचा कंप जाणवल्याचे लोकांनी सांगितले. त्यामुळे भूकंपाचे केंद्र सांगोला असल्यचे स्पष्ट झाल्यानंतर भूकंपाचे धक्के आटपाडीपर्यंत पोहचल्याचेही सिध्द झाले. यापुर्वी आटपाडीसह सांगोला तालुक्यात गूढ़ आवाजाच्या नोंदी झालेल्या आहेत. परंतु भूकंपाच्या नोंदी नव्हत्या. परंतु गुरूवारी सांगोला येथील केंद्रबिंदु असलेल्या भूकंपाचा परिणाम व आवाज नोंदविला गेल्याने भितीचे वातावरण पसरले.








