सातारा :
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत असलेला वाद मिटवून घेण्यासाठी महिलेने खंडणी मागितली होती. या खंडणीच्या नावाखाली कट रचून मंत्री गोरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी म्हसवड पोलिसांची टीम पुण्याला प्रभाकर देशमुख यांच्या चौकशीसाठी गेली होती. मात्र त्यांच्यासोबत भेट न झाल्याने ही टीम परत आली.
साताऱ्यातील एका महिलेने मंत्री जयकुमार गोरे यांनी काही आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅप पाठवल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हा वाद मिटवून घेण्यासाठी महिलेने त्यांना तीन कोटीची खंडणी मागितली होती. यापैकी एक कोटी खंडणी स्वीकारताना तिला स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले होते. मंत्री गोरे यांना बदनाम करण्यासाठी या महिलेला सोबत घेऊन शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख, आमदार रोहित पवार, खा. सुप्रिया सुळे यांनी कट रचला. ही महिला देशमुख यांच्या संपर्कात होती, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तिचे कॉल रेकॉर्ड ही असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले होते. त्यानुसार गुरूवारी म्हसवड पोलिसांची टीम प्रभाकर देशमुख यांच्या पुण्याच्या घरी चौकशीसाठी गेली होती. मात्र ते घरी नसल्याचे सांगण्यात आल्यावर टीम पुन्हा म्हसवडला आली.
- सोसायटीच्या चेअरमनकडून माहिती घेण्याचा प्रयत्न
प्रभाकर देशमुख यांच्या चौकशीसाठी आल्याचे म्हसवड पोलिसांनी ते राहत असलेल्या सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब कदम यांना सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची ही मागणी केली. यावर चेअरमन कदम यांनी वॉरंट किंवा लेखी पत्र असल्याचे देण्याचे सांगितले. परंतु असे पत्र नसून ते घेऊन येतो. असे सांगत पोलीस गेल्याची माहिती कदम यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली. देशमुख हे दिसले का अशी विचारणाही केली. देशमुखांच्या चौकशी प्रकरणी कोरेगाव पार्कच्या पोलिसांची मदत घेत असल्याचे सांगितले. देशमुखांच्या चालकाला ताब्यात घेतल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. पुन्हा चौकशीसाठी येणार असल्याचेही सांगितले.
- पत्र नसल्याने म्हसवड पोलिसांना दाखवला बाहेरचा रस्ता
प्रभाकर देशमुख यांची चौकशी करण्यासाठी म्हसवड पोलिसांनी टीम सातारहून पुण्याला गेली होती. परंतु देशमुख राहत असलेल्या सोसायटीत जाताच त्यांनी चेअरमन कदम यांच्याकडे देशमुखांबाबत विचारणा केली. कदम यांनी लेखी पत्र मागितले मात्र ते नसल्याचे सांगताच पोलिसांना कदमांनी माहिती देण्यास नकार देत थेट बाहेरचा रस्ताच दाखवला. पत्राविना कोणाचाही माहिती देत नाहीत. असा नियम असून तो पोलिसांना माहिती असताना म्हसवड पोलीस पत्राविना का गेले अशा उलट सुलट चर्चा सुरू आहेत..








