उत्पादकांना चिंता, लागवडीत घट
बेळगाव : काजू विक्रीला प्रारंभ झाला असून, किरकोळ बाजारात 150 रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे. मात्र काजूचा हा समाधानकारक दर टिकून राहणार का? असा प्रश्न काजू उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित दरापासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे यंदा तरी अपेक्षित आणि समाधानकारक दर मिळेल का? अशी चिंता लागली आहे. काजूला योग्य बाजारपेठ नसल्याने मिळेल त्या दराला ती विकावी लागते. जिल्ह्यात सर्वाधिक खानापूर तालुक्यात काजूचे क्षेत्र आहे. त्यानंतर बेळगाव तालुक्यातही काजूचे उत्पादन घेतले जाते. मात्र दोन्ही तालुक्यांमध्ये काजू विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराला काजू विकावी लागते. 4 वर्षापूर्वी काजूचा दर प्रतिकिलो 140 रुपयांपर्यंत गेला होता. गतवर्षी तो 100 रुपयांपर्यंत होता. यंदा काजू 150 रुपयांपर्यंत विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रत्यक्षात हा दर टिकून राहणार का? हेच पहावे लागणार आहे.
बदलत्या हवामानामुळे यंदा उत्पादनात मोठी घट
बदलत्या हवामानामुळे यंदा उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. अलीकडे काजू क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे सहाजिकच उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. मात्र उत्पादित काजू विक्री कोठे करावी? हा प्रश्न कायम आहे. शिवाय योग्य हमीभावाशिवाय ती मिळेल त्या दराला विक्री करण्याची वेळ येऊ लागली आहे. त्यामुळे काजूसाठी बाजारपेठ उपलब्ध करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.









