कोल्हापूर / संतोष पाटील :
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पन्हाळा तालुक्यातील जोतिबा डोंगर येथील श्रीक्षेत्र जोतीबा देवस्थान परिसराचा कायापालट होणार आहे. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यातील 500 कोटींच्या कामांना परवानगी दिली आहे. जोतीबा देवस्थान आराखड्यातून भाविकांना पायाभूत सुविधा मिळतील. जिह्यातील धार्मिक पर्यटन वाढीसाठी येथील विकास आणि संवर्धन हा मैलाचा दगड ठरणार आहे.
श्री जोतिबा मंदिर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा’ तयार केला आहे. या आराखड्यामध्ये जोतिबा डोंगरावरील मंदिरांचे संवर्धन, ऐतिहासिक पायवाटांचे सुशोभीकरण, पर्यावरण संरक्षण आणि भाविकांसाठी आधुनिक सुविधांचा समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी जोतिबा विकास प्राधिकरणामार्फत होणार आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती प्रस्तावित आहे. या आराखड्याची अंदाजित किंमत 1600 कोटी रुपये असून, हा संपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील 272 आणि 227 कोटीच्या आराखड्याला तत्वत: मंजुरी मिळाली आहे.
जोतिबा देवस्थान आराखड्याचा पहिला टप्पा जोतिबा डोंगराला सुंदर, सुसज्ज आणि पर्यावरणपूरक तीर्थक्षेत्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. पर्यावरण संरक्षण होऊन डोंगरावरील तलावांचे संवर्धन आणि वनीकरणाद्वारे जोतिबा डोंगराचा नैसर्गिक समतोल राखला जाईल. वाहनतळ, स्वच्छतागृहे आणि पाण्याची सुविधा यामुळे भाविकांना दर्जेदार सुविधा मिळेल. अंगारकर वाडा आणि तलावांचे संवर्धन करून जोतिबाचा इतिहास टिकवण्याचा प्रयत्न आराखड्याच्या माध्यमातून होणार आहे.
- श्री जोतिबा मंदिर संवर्धन व दुरुस्ती
जोतिबा मंदिराचे संरचनात्मक नूतनीकरण आणि प्राचीन कोरीव कामांचे जतन
मूळ मूर्तीचे संवर्धन (जानेवारी 2025 मध्ये पुरातत्व विभागाने चार दिवसांची प्रक्रिया राबवली होती). मंदिर परिसरात दर्शन रांगांसाठी सुव्यवस्था आणि ऑनलाईन बुकिंग सुविधा.
- श्री यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती
डोंगरावरील यमाई मंदिराचे संवर्धन आणि दुरुस्ती.
परिसरात स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा विकास, मुबलक आणि शुध्द पाणी आणि विश्रामगृह व्यवस्था
- जुन्या ऐतिहासिक पायवाटांचे संवर्धन व सुशोभीकरण
अ) गायमुख ते दक्षिण दरवाजा : 4.5 मीटर रुंदी, 800 मीटर लांबीची पायवाट मजबूत करणे आणि सुशोभित करणे.
ब) गायमुख परिसरातून येणारी पायवाट : 4.5 मीटर रुंदी, 400 मीटर लांबीची पायवाट दुरुस्ती.
क) गिरोली परिसरातून येणारी पायवाट : 4.5 मीटर रुंदी, 700 मीटर लांबीची पायवाट सुधारणा.
ड) केखले व जाखले परिसरातून येणारी पायवाट : 4.5 मीटर रुंदी, 900 मीटर लांबीची पायवाट संवर्धन.
इ) मानपाडळे ते जोतिबा डोंगर पायवाट : 4.5 मीटर रुंदी, 5 किलोमीटर लांबीची पायवाट मजबुतीकरण आणि सुशोभीकरण.
- जोतिबा डोंगर कड्यांचे संवर्धन
डोंगरावरील कड्यांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी 28,800 नवीन झाडांचे वनीकरण केले जाणार आहे. प्लास्टिकमुक्त परिसरासाठी उपाययोजना आणि सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर असणार आहे.
देवस्थान व्यवस्थापन ऑफिस आणि प्राधिकरण कार्यालय, जोतिबा विकास प्राधिकरणासाठी नवीन कार्यालय बांधणे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करून कामांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
- नवीन प्रस्तावित कामे
1 ज्योत स्तंभ (दोन ठिकाणी) : प्रत्येकी 1,000 चौरस मीटर क्षेत्रावर, एकूण 2,000 चौरस मीटर जागेत उभारणी करणे.
2 नवे तळे एरिया – 12 ज्योतिर्लिंग : 5,000 चौरस मीटर क्षेत्रात बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतिकृती क्षेत्र विकसित करणे.
3 केदार विजय गार्डन : 10,000 चौरस मीटर क्षेत्रात उद्यान निर्मिती.
4 यमाई मंदिर (चाफेवन) परिसर विकास: यमाई मंदिर परिसरात सुविधा आणि सौंदर्यीकरणाचे काम केले जाणार आहे.
या सर्व कामांची प्रभावी अंमलबजावणी, नियोजन आणि देखरेखीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. सल्लागार कंपनी कामांचे तांत्रिक नियोजन आणि अंदाजपत्रक तयार करेल. निविदा प्रक्रिया आणि कंत्राटदारांची निवड करेल. कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे आणि गुणवत्ता तपासणीची जबाबदारी कंपनीची राहील. स्थानिक प्रशासन आणि जोतिबा विकास प्राधिकरण यांच्यात समन्वय साधण्याचे काम सल्लागार कंपनी करेल.
- आराखड्याचे उद्दिष्ट आणि महत्त्व
धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणूक : जोतिबा आणि यमाई मंदिरांचे संवर्धन करून त्यांचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व टिकवणे.
भाविकांसाठी सोयी : रोप–वे, सुधारित रस्ते, निवास आणि स्वच्छता सुविधा उभारल्याने भाविकांची सोय.
पर्यटनाला चालना : नवीन उद्याने, ज्योत स्तंभ आणि पायवाटांचे सुशोभीकरण यामुळे धार्मिक पर्यटन वाढीसह देश–विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणे.
पर्यावरण संरक्षण : वनीकरण आणि प्लास्टिकमुक्त परिसराद्वारे निसर्गाचे रक्षण करणे.
- तलाव संवर्धन व सुशोभीकरण
जोतिबा डोंगर परिसरातील ऐतिहासिक तलावांचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण करून त्यांचे मूळ स्वरूप जपले जाणार आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढेल आणि पर्यावरण संतुलन राखले जाईल. यात खालील तलावांचा समावेश आहे
कर्पूर तलाव संवर्धन व सुशोभीकरण : तलावाची स्वच्छता, काठांचे बांधकाम आणि परिसराचे सौंदर्यीकरण
चव्हाण तलाव संवर्धन व सुशोभीकरण : पाण्याचा निचरा सुधारणे आणि आसपासच्या परिसरात हिरवळ निर्माण करणे.
मुरलीधर पुष्करणी तलाव संवर्धन व सुशोभीकरण : धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तलावाचे जतन आणि सुशोभिकरण करणे.
- पुरातन वास्तूंचे संवर्धन
श्री जोतिबा डोंगरावर ऐतिहासिक अंगारकर वाडा व बाव संवर्धन : जोतिबा डोंगरावरील अंगारकर वाडा आणि बाव (पाण्याचा हौद) यांचे संरचनात्मक संवर्धन करून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व टिकवणे. या ठिकाणी माहिती फलक आणि पर्यटकांसाठी मार्गदर्शन सुविधा उभारली जाणार आहे.
भाविकांसाठी वाहनतळ आणि सुविधा केंद्राची कामे : भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन, विशेषत? चैत्र यात्रेसारख्या मोठ्या उत्सवांदरम्यान, मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. यात खालील कामांचा समावेश आहे
- श्री जोतिबा डोंगरावर वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था : खर्च : 7.50 कोटी रुपये
1 वाहनतळाची सुविधा, ज्यामुळे उत्सवकाळासह इतर वेळी सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळता येईल आणि भाविकांना सोय होईल.
2 पुरुष व महिलांकरिता सुसज्य स्वच्छतागृहे व चेंजिंग रूम : खर्च: 9.50 कोटी रुपये
आधुनिक स्वच्छतागृहे आणि कपडे बदलण्याच्या खोल्या बांधल्या जाणार आहेत.
3 शुद्ध पिण्याच्या पाण्याची (पाणपोई) सुविधा : खर्च: 5.09 कोटी रुपये
भाविकांसाठी स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची उपलब्ध केले जाईल.








