वृत्तसंस्था/फॉझ डु इगॉकू, ब्राझील
येथे सुरू असलेल्या वर्ल्ड कप बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या मनीष राठोड, हितेश व अभिनाश जमवाल यांनी शानदार विजय मिळवित आपापल्या वजन गटातून उपांत्य फेरी गाठली. जमवालने 65 किलो वजन गटातील लढतीत जर्मनीच्या डेनिस ब्रिलचा एकतर्फी पराभव केला तर 70 किलो वजन गटात हितेशने इटलीच्या गॅबियली गिडी रोन्तानीचा पराभव केला. 55 किलो वजन गटात मनीष राठोड व ऑस्ट्रेलियाच्या युसूफ छोथिया यांची लढत अटीतटीची झाली. तीनही फेऱ्यांत दोघांनी तोडीस तोड खेळ केला, पण अखेर राठोडला विजयी घोषित करण्यात आले. तीन पंचांनी त्याच्या बाजूने गुण दिले तर दोन पंचांनी दोघांनाही समान गुण दिले. उपांत्य फेरीत राठोडची लढत कझाकच्या नुरसुलतान अल्तीनबेकशी, हितेशची लढत मकान त्राओरशी तर जमवालची लढत जियानलुइजी मलंगाशी होईल. 75, 85, 90 किलोवरील गटात मात्र भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारताच्या तीन बॉक्सर्सनी झुंजार लढत दिली. पण त्यांना अखेर पराभूत व्हावे लागले. निखिल दुबे (0-5), जुगनू (1-4), नरेंदर (2-3) यांना पराभव स्वीकारावा लागला.









