वृत्तसंस्था/माद्रीद
कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना संघाने अॅटलेटिको माद्रीदचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता बार्सिलोना आणि रियल माद्रीद यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बार्सिलोनाने अॅटलेटिको माद्रीदचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. गेल्या चार वर्षांच्या हंगामामध्ये बार्सिलोनाने पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या उपांत्य सामन्यात बार्सिलोना संघातर्फे एकमेव विजयी निर्णायक गोल फेरान टोरेस्टने केला. या स्पर्धेच्या गेल्या फेब्रुवारीत झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीत बार्सिलोना आणि अॅटलेटिको माद्रीद यांच्यातील सामना 4-4 असा बरोबरीत राहिला होता.
त्यानंतर बार्सिलोनाने सरासरीच्या जोरावर 5-4 अशी अॅटलेटिको माद्रीदवर मात करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात रियल माद्रीदने रियल सॉसीदादचा सरासरी 5-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. 2013-14 नंतर पहिल्यांदाच कोपा डेल रे स्पर्धेत बार्सिलोना आणि रियल माद्रीद यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. 2013-14 साली रियल माद्रीदने बार्सिलोनाचा पराभव करुन विजेतेपद मिळविले होते. कोपा फुटबॉलमध्ये बार्सिलोना हा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. त्यांनी आतापर्यंत कोपाच्या स्पर्धेमध्ये 31 चषके मिळविली आहेत. पण 2021 नंतर पहिल्यांदाच बार्सिलोनाने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे.









