वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांच्या निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवरील बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. येथील वायू प्रदूषण बऱ्याच काळापासून धोकादायक पातळीवर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. रस्त्यांवर काम करणाऱ्या लोकांना प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास होतो. प्रत्येकालाच त्यांच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी एअर प्युरिफायर बसवण्याची सुविधा नसते, असे या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती अभय एस. ओक आणि उज्ज्वल भुईंया यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
गेल्या सहा महिन्यात न्यायालयाने वायू प्रदूषणाशी संबंधित अनेक आदेश दिले आहेत. दिल्लीतील वायू प्रदूषणाची परिस्थिती खूपच वाईट आहे. राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत आरोग्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यामध्ये स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार देखील समाविष्ट असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. दिल्लीतील विलक्षण परिस्थिती लक्षात घेता फटाक्यांच्या वापरावरील निर्देश आणि निर्बंध अत्यंत आवश्यक असल्याचे वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशांवरून दिसून येते, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.









