सोनिया गांधींना पीएम संग्रहालयाची सूचना
नवी दिल्ली : पंतप्रधान संग्रहालय आणि पुस्तकालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना एक पत्र लिहून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या वैयक्तिक दस्तऐवजांपर्यंत पोहोच प्रदान करण्याची मागणी केली आहे. यात नेहरू-एडविना यांची पत्रं देखील सामील आहेत. हे दस्तऐवज मे 2008 मध्ये सोनिया गांधी यांनी नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्रेरीकडून मागविले होते. या दस्तऐवजांना संशोधकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे, जेणेकरून आधुनिक भारतीय इतिहासाला चांगल्याप्रकारे समजून घेता येईल असे पीएम संग्रहालयाने म्हटले आहे. पीएम संग्रहालयाने सोनिया गांधी यांना नेहरूंशी संबंधित अन्य महत्त्वपूर्ण पत्रं पुरविण्याची विनंती केली आहे.
सोनिया गांधी यांच्या कार्यालयाने या पत्राप्रकरणी अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पंतप्रधान संग्रहालयाने मागील वर्षी देखील गांधी परिवाराला नेहरूंकडून एडविना माउंटबॅटन आणि अल्बर्ट आइन्स्टाइन यासारख्या ऐतिहासिक व्यक्तींना लिहिण्यात आलेली वैयक्तिक पत्रं परत करण्याची विनंती केली होती. तसेच दस्तऐवज परत करणे किंवा कमीतकमी त्यांच्या डिजिटल किंवा फोटोग्राफित प्रती उपलब्ध करण्याचा आग्रह केला होता. पंतप्रधान संग्रहालयाच्या रेकॉर्डनुसार सोनिया गांधी यांनी परत मिळविलेल्या दस्तऐवजांमध्ये नेहरू आणि जयप्रकाश नारायण, एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइनस्टाइन, अरुणा आसिफ अली, विजयलक्ष्मी पंडित आणि जगजीवन राम यांच्यात झालेला पत्रसंवाद सामील आहे.









