सांगली :
शहरातील संजयनगर परिसरातील एका व्यावसायिकाचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी आतील ७० हजाराचा ऐवज लंपास करून पोबारा केला. ही घरफोडी रविवार दि. ३० मार्च रोजी सायंकाळी पाच ते मंगळवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजण्याच्या पर्यतच्या कालावधीत घडली.
याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात राजाराम शिवाजी रुपनर (रा. साई मंदिर, संजयनगर, सांगली) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी राजाराम रुपनर यांचा वेल्डिंगचा व्यवसाय आहे. काही कामानिमित्त ते दोन दिवस घरास कुलूप लावून परगावी गेले होते.
दरम्यानच्या कालावधीत चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाकघरातील लॉफ्टमध्ये ठेवलेल्या सुटकेसमध्ये असलेले सोन्याचांदीचे दागिने चोरट्याने लंपास करुन पोबारा केला. यामध्ये १४ हजार रुपयांचे ४ ग्रॅमचे सोन्याचे झुबे, १२ हजारची ३ ग्रॅमची साखळी, २ हजारचे सोन्याचे ब्रेसलेट, १ हजारचा चांदीचा करदोडा आणि जोडव्या तसेच रोख ४० हजाार या ऐवजाचा समावेश आहे.
गावाहून परत आल्यावर रुपनर यांच्या लक्षात चोरीची बाब आली. त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यावर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.








