धाराशिव / देविदास पाठक :
धाराशिव जिल्ह्यात उद्योजकांचे प्रमाण वाढावे आणि जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे या उद्देशाने राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमावर विशेष भर दिला जात असून यामुळे धाराशिव जिल्हा सलग तिसऱ्या वर्षी राज्यात अव्वल स्थानी राहिला असून मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. धाराशिव जिल्हा आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीतून बाहेर येऊन विकसित व्हावा ,यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने राबवलेल्या विविध योजनांमुळे धाराशिव जिल्ह्याचा उत्पादकता निर्देशांक उंचावत आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची धाराशिव जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून प्रभावी अंमलबजावणी होत आहे. सन 2022- 23 यावर्षी धाराशिव जिल्ह्याला 600 उद्योजकांचे उद्दिष्ट देण्यात आले होते प्रत्यक्षात 653 उद्योजकांचे उद्योग सुरू झाले, तर सन 2023 – 24 या वर्षात 800 उद्योजकांचे उद्दिष्ट असताना 873 उद्योजकांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून आपले स्वतःचे उद्योग सुरू केले होते.तर चालू वर्षी सन 2024 -25 मध्ये जिल्ह्याला 723 चे उद्दिष्ट दिलेले असताना प्रत्यक्षात 799 उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय उभारले आहेत.
राज्य शासनाच्या उद्योग विभागाने एक एप्रिल रोजी आपल्या संकेतस्थळावर राज्यातील सर्व जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केली आहे यात सातारा, चंद्रपूर ,सांगली, बुलढाणा, रत्नागिरी, कोल्हापूर, धाराशिव, नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, लातूर, वर्धा, अहिल्यानगर, गडचिरोली, यवतमाळ, रायगड, आणि पालघर या जिल्ह्यांना दिलेले निर्धारित उद्दिष्ट साध्य झाल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय उभारणी ,उद्योजकांना मदत ,प्रशिक्षण आणि उद्योजकीय वातावरण निर्मितीतून रोजगार निर्मितीचे काम जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योग संघ यांना देण्यात आले आहे.या सोबतच स्थानिक महिला बचत गटात गटांनीही यात उद्योग व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केलेली आहे.शासकीय यंत्रणांच्या सोबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे, आणि या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात मोठे योगदान देत अनेकांना रोजगार निर्मितीसाठी मदत आणि नवउद्योजक उभारणी कामी हातभार लावलेला आहे.
धाराशिव जिल्ह्याची उद्योजकतेकडून विकासाकडे होत असलेली वाटचाल अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरत आहे.या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून धाराशिव जिल्ह्यात उद्योजकांची वाढणारी संख्या पाहता जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन विकसित धाराशिव जिल्हा अशी ओळख निर्माण होत असल्याचे आशादायी चित्र दिसत आहे.








