कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठाने पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ घेणार असा निर्णय घेतला होता. परंतू महाविद्यालयांच्या मागणीमुळे हा निर्णय मागे घेत महाविद्यालयांना परीक्षा घेण्याची परवानगी दिली होती. मार्च–एप्रिल 2025 उन्हाळी सत्रातील परीक्षा विद्यापीठ घेणार असल्याचे समजताच महाविद्यालयांनी पुर्वीप्रमाणे आम्हीच परीक्षा घेणार, अशी भूमिका घेतल्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी पारंपारिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा स्थगित करण्याची नामुष्कि विद्यापीठावर ओढवली. सहा महिने अभ्यास करून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी परीक्षा स्थगित झाल्याचे परिपत्रक वाचल्यानंतर धक्काच बसला. ऐवढेच नाही तर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
शिवाजी विद्यापीठातील प्रथम सत्राच्या परीक्षा महाविद्यालयच घेणार, अशी ताठर भूमिका महाविद्यालयांनी घेतली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत बी. ए., बी. कॉम., बीएस्सी., बीएस्सी एंटायर, बी. बी. ए., बीसीए., बीकॉम, कॉम्युटर अॅप्लिकेशन, बीकॉम बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन व बी. होक, भाग एकमधील भाग एक व दोन सत्राच्या 2, 3, व 4 एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. विद्यापीठाने मात्र काही विद्यार्थ्यांची प्रॅक्टीकल पूर्ण नसल्याचे कारण पुढे केले आहे. वास्तवात महाविद्यालयांनी प्रथम वर्षाचा निकाल वाढवा, विद्यार्थी संख्या टिकावी यासाठी परीक्षा महाविद्यालयच घेणार असल्याची भूमिका घेतली आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांना परीक्षा घेण्याची परवानगी दिली नाही तर असहकाराची तयारीदेखील महाविद्यालयांनी केली आहे. परिणामी परीक्षा स्थगित करण्याशिवाय विद्यापीठाकडे कोणताच पर्याय उरलेला नाही. विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतर्गत वादात परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा स्थगित केल्याने विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल, याचा विचार मात्र कोणीच केला नसल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील उन्हाळी सत्रामधील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ होणार होता. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयातील 300 महाविद्याललये आणि विद्यापीठातील 40 अधिविभागातून 2 लाख 25 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परंतू पारंपारिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अचानक स्थगित झाल्याने शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थ्यांमध्ये संभ्रवस्था आहे. कोणी म्हणते 2, 3, आणि 4 फेब्रुवारीचे पेपर स्थगित केले असून पुढचे पेपर घेतले जाणार आहेत. तर कोणी म्हणतेय परीक्षाच स्थगित केल्या आहेत, अशा चर्चा विद्यार्थ्यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर सुरू आहेत. विद्यार्थी आपआपल्या परिने विचार करून परीक्षेसंदर्भातील चुकीचा मेसेज व्हॉटसअॅपवर टाकत आहेत. दुसरीकडे मात्र महाविद्यालयांना परीक्षा घेण्याचे अधिकार पाहिजेत, यासाठी अटापिटा सुरू आहे. यात विद्यार्थ्यांचा काय दोष, असेही काही विद्यार्थी सोशल मिडियावर बोलले जात आहे.
- निकाल विद्यापीठाला पाठवणार
महाविद्यालयातील पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयाकडे द्याव्यात अशी आमची मागणी आहे. येत्या दोन दिवसात विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेवून महाविद्यालयच परीक्षा घेणार आहे. प्रश्नपत्रिका विद्यापीठाची असली तरी महाविद्यालय परीक्षेसह पेपर तपासणी करून निकाल विद्यापीठाला पाठवला जाणार आहे.
डॉ. व्ही. एम. पाटील (प्राचार्य न्यू कॉलेज व व्यवस्थापन परिषद सदस्य, शिवाजी विद्यापीठ)
- प्रश्नपत्रिका विद्यापीठच पाठवणार
नवीन शैक्षणिक धोरणानुसार 70 ते 80 टक्के विद्यार्थ्यांचे प्रॅक्टीकल राहिली आहेत, त्यामुळे परीक्षा स्थगित केल्या आहेत. रिमोट सिक्युअर रिमोट पेपर डिलिव्हरी (एसआरपीडी)च्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका पाठवणार आहे. परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल.
डॉ. अजितसिंह जाधव (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ )








