नागरिकांचा संताप तर रुग्णांनाही ताप
बेळगाव : मंगळवारी सायंकाळपासून सर्व शासकीय कार्यालयांना सर्व्हरडाऊनचे ग्रहण लागले आहे. बुधवारी दुपारपर्यंत देखील सर्व्हरडाऊनची समस्या कायम होती. त्यामुळे विविध शासकीय कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तासन्तास रांगेत थांबावे लागले. बेंगळूरवरूनच सर्व्हर समस्या असल्याचे अधिकारी सांगत होते. मात्र, यामुळे अनेकांची कामे खोळंबल्याने मन:स्ताप सहन करावा लागला. केंद्र तसेच राज्य सरकारने विविध सरकारी कामांसाठी ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. मात्र, ही ऑनलाईन सेवा बऱ्याचवेळा तापदायक ठरत आहे. वारंवार सर्व्हरडाऊन समस्या निर्माण होत असल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना तासन्तास वाट पहात थांबावे लागत आहे. विशेष करून कर्नाटक वन, बेळगाव वन त्याचबरोबर आदी ऑनलाईन सेवाकेंद्रांवर मंगळवारी सायंकाळपासून सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण झाली आहे. सायंकाळी साडेचारपासून डाऊन झालेले सर्व्हर बुधवारी दुपारपर्यंत देखील कायम होते.
जिल्हा रुग्णालयातही सर्व्हरडाऊन समस्येने रुग्ण-नातेवाईक त्रस्त
जिल्हा रुग्णालयातही सर्व्हरडाऊन समस्येने रुग्ण व नातेवाईक त्रस्त झाले आहेत. ओपीडी त्याचबरोबर अॅडमिट होणाऱ्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्याचबरोबर आरोग्य कर्नाटक योजनेचा लाभ घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयाच्या कक्षाबाहेर सायंकाळी सहापर्यंत ताटकळत थांबावे लागले. संबंधित ऑपरेटरकडून वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले. मात्र, बेंगळूरवरूनच सर्व्हर डाऊन असल्याने ऑपरेटरदेखील काही करू शकले नाहीत. मात्र, या समस्येमुळे जनतेला मात्र वेगवेगवेळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले.









