मोबाईलचे टॉर्च पेटवून अंत्यसंस्कार करण्याची वेळ : महापालिकेचे दुर्लक्ष
बेळगाव : शहरातील स्मशानभूमीमधील समस्या सोडविण्याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. वडगाव स्मशानभूमीतील दिवे बंद असल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोमवारी पाटील गल्ली, वडगाव येथील शेतकरी विष्णू चतूर यांचे निधन झाले. रात्री स्मशानभूमीत दिवे नसल्याने उपस्थित नातेवाईक व नागरिकांना मोबाईलचे टॉर्च पेटवून अंत्यसंस्कार करावे लागले. त्यामुळे मनपाच्या आंधळ्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
शहरातील सदाशिवनगर, शहापूर, वडगाव आदी स्मशानभूमींच्या विकासाबाबत महापालिकेच्या बांधकाम स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेत चर्चा केली जाते. नवीन शेड उभारण्यासह शवदाहिन्या आणि दिवे बसविण्याबाबत प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांना सूचना केली जाते. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीच होत नसल्याने स्मशानभूमींमध्ये अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणी करूनही त्याकडे अधिकारी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बंद असलेले दिवे तातडीने सुरू करा
दोन दिवसापूर्वी पाटील गल्ली वडगाव येथील शेतकरी विष्णू चतूर यांचे निधन झाले. त्यामुळे रात्री त्यांच्यावर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह वडगाव स्मशानभूमीत नेण्याचा निर्णय झाला. मात्र सुरू असलेल्या गटारीच्या कामामुळे रात्रीच्या अंधारात तेथून ये-जा करताना कष्ट करावे लागले. रस्त्यावर तसेच स्मशानभूमीच्या आवारात असलेले दिवे बंद असल्याने उपस्थित नातेवाईक व नागरिकांनी मोबाईलची टॉर्च पेटवून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या गंभीर प्रश्नाकडे लोक प्रतिनिधी, मनपाने दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त केला. बंद असलेले दिवे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. एकंदरीत अखेरचा प्रवास देखील वडगाव स्मशानभूमीत खडतर बनला आहे.









