बिल्डिंग परमिशन सक्तीमुळे 15 दिवसांत केवळ 140 अर्ज
बेळगाव : नवीन वीज मीटर मिळविण्यासाठी बिल्डिंग परमिशनची सक्ती हेस्कॉमने केली आहे. यामुळे नवीन वीज मीटर घेणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. मागील 15 दिवसांत बेळगाव शहर विभागात केवळ 140 ग्राहकांनाच मीटर देण्यात आले आहे. योग्य कागदपत्रे नसल्याने अनेकांची कार्यालयांमध्ये धावपळ सुरू आहे. 13 मार्च रोजी कर्नाटक विद्युत नियामक मंडळ (केईआरसी)ने नवीन मीटरसाठी नियमावली जारी केली. बिल्डिंग परमिशन व अॅप्रुड प्लॅन असेल तरच नवीन मीटर दिले जावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या नियमांची अंमलबजावणी करत केईआरसीने संपूर्ण राज्यभर नवीन नियमावली लागू केली.
यापूर्वी बेळगाव शहर विभागात महिन्याला 700 ते 800 टेम्पररी व परमनंट कनेक्शन दिली जात होती. सध्या मात्र ही संख्या खूप कमी झाली आहे. बेळगाव शहर उपविभाग-1 मध्ये तर केवळ आठ कनेक्शन देण्यात आली आहेत. त्यामध्ये अपार्टमेंटची संख्या अधिक आहे. बिल्डिंग परमिशन, तसेच इतर कागदपत्रे सक्तीची करण्यात आल्याने मीटर घेणे अवघड झाले आहे. बेळगावमध्ये अधिक तर प्लॉट खरेदी ही मुद्रांक (बाँड) वर करण्यात आली असल्याने बिल्डिंग परमिशन महापालिकेकडून दिले जात नाही. याचा फटका आता नागरिकांना बसू लागला आहे.
मीटर मिळविण्यासाठी हेस्कॉम कार्यालयाकडे धावपळ
शहरातील शाहूनगर, बसव कॉलनी, वैभवनगर, गांधीनगर, न्यू गांधीनगर, अमननगर, सांबरा रोड, जयनगर, विजयनगर, समर्थनगर, गणेशपूर रोड, टीचर्स कॉलनी, खासबाग, वडगाव, अनगोळ या परिसरात बाँडवर प्लॉट खरेदी करण्यात आली असल्याने बांधकामाची नवीन कामे ठप्प आहेत. मीटर मिळविण्यासाठी हेस्कॉम कार्यालयाचे उंबरठे झिजविले जात आहेत. परंतु कागदपत्रे नसल्याने पुन्हा माघारी फिरण्याची वेळ येत आहे.









