कार्यपद्धतीची जाणून घेतली माहिती : विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची सूचना
बेळगाव : जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी बुधवारी शहरातील दहावी परीक्षा केंद्रांना भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेज परीक्षा केंद्राला त्यांनी भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, अशा सूचना पर्यवेक्षक व केंद्र प्रमुखांना करण्यात आल्या. परीक्षा सुरळीत, तसेच पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही योग्यप्रकारे कार्यरत आहेत का? याची तपासणी त्यांनी केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, नोडल अधिकारी एन. आर. पाटील, मराठा मंडळच्या मुख्याध्यापिका लता शिंदे व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विज्ञान पेपरला 613 विद्यार्थी अनुपस्थित
बुधवारी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 97 परीक्षा केंद्रांवर विज्ञान विषयाचा पेपर घेण्यात आला. 33996 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 32,782 विद्यार्थी परीक्षेला हजर होते. तर 613 विद्यार्थ्यांनी पेपरला दांडी मारली. शुक्रवार दि. 4 रोजी अखेरचा पेपर होणार असल्याने विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे.









