वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यांना उपचारासाठी तातडीने पाटण्यातील पारस रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासण्याअंती डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार होणार आहेत. लालू यादव यांच्यासोबत पत्नी राबडीदेवी आणि मुलगा तेजस्वी यादव उपस्थित आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लालू यादव यांची प्रकृती बिघडल्यानंतर, राजद कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत असून त्यांच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.
लालूप्रसाद यादव हे बऱ्याच काळापासून गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. 2024 मध्ये त्यांची मुंबईत अँजिओप्लास्टी झाली असून स्टेंट बसविण्यात आला आहे. त्यापूर्वी 2022 मध्ये त्यांचे सिंगापूरमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. त्यांची धाकटी मुलगी रोहिणी आचार्य हिने त्यांना मूत्रपिंड दान केले होते. किडनी प्रत्यारोपणानंतर काही वर्षे त्यांची प्रकृती तंदुरुस्त होती. मात्र, आता वाढत्या वयामुळे त्यांना वारंवार आजारांचा सामना करावा लागत आहे.









