पाकिस्तानचे दोन सैनिक ठार : घुसखोरांना हुसकावून लावले
वृत्तसंस्था/ पुंछ
पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सीमेत घुसखोरी केल्यावर भूसुरुंगाचा स्फोट झाला आणि यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने गोळीबार केला आहे. या आगळीकीला भारतीय सैन्याने त्वरित आणि चोख प्रत्युत्तर दिले ओह. भारताकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेल्याचे समजते. तसेच पाकिस्तानचे 5 सैनिक भूसुरुंगाच्या स्फोटात जखमी झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या दोन चौक्या मिर्झा एडी आणि मिर्झा मोर येथून घुसखोरीचा प्रयत्न झाला होता.
स्थिती नियंत्रणात असून सैन्य पूर्णपणे नजर ठेवून आहे. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीमुळे मंगळवारी एका भूसुरुंगाचा स्फोट झाला, ज्यानंतर पाकिस्तानी सैन्याने विनाकारण गोळीबार केला आणि संघर्षविरामाचे उल्लंघन केले, भारतीय सैन्याला या घटनेनंतर चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती सैन्याचे जम्मू येथील प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल सुनील बर्तवाल यांनी बुधवारी दिली आहे.
गुप्तचर सूत्रांनुसार भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत पाकिस्तानच्या सैन्याचे दोन जवान मारले गेले आहेत. या मृत्युमुखी पडलेल्या पाकिस्तानी जवानांची नावे चौधरी नजाकत अली (चरिकोट हवेली) आणि नसीर अहमद (नकयाल कोटली, पीओके) असल्याचे समोर आले आहे.
दहशतवादविरोधी मोहीम
याचदरम्यान जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांची दहशतवादविरोधी मोहीम देखील जारी आहे. तेथे आतापर्यंत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून अन्य तीन दहशतवादी पंजार्थी भागात लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. जानेवारी 2025 पासून पाकिस्तान सातत्याने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर चिथावणी देणाऱ्या कारवाया करत आहे.
चालू वर्षातील पाकिस्तानची आगळीक
12 मार्च : राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी स्नायपर फायरमध्ये एक भारतीय सैनिक जखमी झाल.
21 फेब्रुवारी : पुंछमध्ये ब्रिगेडियर स्तरीय बैठकीत भारताने सीमेवर आम्ही शांतता इच्छितो, परतु पाकिस्तानने आगळीक सुरूच ठेवली तर भारतीय सैन्य प्रत्युत्तराच्या कारवाईचा अधिकार राखून असल्याचे स्पष्ट केले.
11 फेब्रुवारी : जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये आयईडी स्फोटात कॅप्टन करमजीत सिंह बख्शीसमवेत दोन भारतीय सैनिक हुतात्मा.
10, 14 फेब्रुवारी : पुंछ आणि राजौरीमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन भारतीय सैनिक जखमी.
भारतीय सैन्याचा कठोर इशारा
2021 च्या डीजीएमओ कराराचे पालन करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत, परंतु पाकिस्तानने स्वत:ची आगळीक थांबविली नाही तर त्याला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असे भारतीय सैन्याने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ स्तरीय चर्चेनंतर संघर्षविराम कराराचे नुतनीकरण करण्यात आले होते. या संघर्षविराम करारानंतर मागील काही काळात नियंत्रण रेषेवर शांततेचे वातावरण होते, परंतु दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रकार मात्र पाकिस्तानकडुन सुरूच होते. या दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सैन्याने मागील काही काळात कठोर कारवाई केल्याने सीमावर्ती भागात शांततेचे वातावरण आहे.









