सांगली :
वाढीव घरपट्टीबाबत मनपा प्रशासनाच्या वतीने घालण्यात आलेल्या घोळाचा पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असून मार्च २०२५ अखेर घरपट्टीची केवळ ४३ टक्के तर पाणीपट्टीची फक्त २२ टक्के वसुली झाली आहे. मनपा कर विभागाने ही माहिती दिली.
वाढीव घरपट्टीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरी स्थगिती दिली असली तर चालू बिले भरण्याबाबत कोणतीच अडचण नव्हती. पण मनपाच्या घोळामुळे लोकांनी घरपट्टी भरली नाही. मालमत्ताधारकांना वाढीव बिले आणि चालू बिले यातील फरक लक्षात आला नाही. मनपाच्या वतीने याबाबत स्पष्टीकरण केले नाही. पालकमंत्र्यांनी स्थागिती दिली असतानाही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाढीव घरपट्टीच्या नोटीस आणि त्यावर सुनावणी घेण्याचा प्रकार सुरूच ठेवला.
या घोळात लोकांना चालू आणि वाढीव घरपट्टीमधील फरक न समजल्याने अनेकांनी चालू घरपट्टीही भरली नाही. त्याचा मनपाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. घरपट्टीची थकबाकीची रक्कम मोठी आहे. चालू बिलांची मागणी ४७ कोटी होती. चालू बिलातील वसुली ६५ टक्के झाली तथापि थकबाकीच्या ७६ कोटीपैकी केवळ १५ कोटी इतकेच वसुल झाले.
थकबाकी वसुलीचे प्रमाण केवळ २० टक्के आहे. घरपट्टीच्या एकत्रित १४९ कोटीपैकी ६३. १२ कोटी रूपयांची वसुली झाली. वसुलीचे प्रमाण ४३ टक्के इतके आहे. दंड म्हणजेच शास्तीमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के सवलत होती. तर ३१ मार्चपर्यंत ७५ टक्के सवलत TAXES होती. त्यामध्ये १२ ते १५ कोटीने वसुली कमी झाली आहे. पाणीपट्टीच्या बिलामध्ये थकबाकीची रक्कम ६५ कोटी तर चालू बिलांची मागणी २१ कोटी अशी एकूण ८७ कोटीच्या आसपास वसुली व्हायला हवी होती. त्यातील केवळ १८ कोटी रूपयेच वसुल झाले आहेत. पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण केवळ २२ टक्के इतकेच आहे.








