वडूज :
खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या चिमुकलीचा उरमोडी कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर तिच्या बरोबर असणारा शाळकरी बंधू अद्याप बेपत्ता आहे.
याबाबतची अधिक माहिती शिरसवडी येथील खोलओढा शिवारातील शिवाजी नाना इंगळे यांचा सात वर्षाचा मुलगा गणू व पाच वर्षाची मुलगी रिया हे दोघे शाळेतून घरी परत येताना हा अपघात घडला असल्याची चर्चा आहे.
मयत रिया ही गोपूजवाडा येथिल अंगणवाडीत तर बेपत्ता गणू हा शिरसवडी भागशाळेत दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मंगळवारी शाळा सुटल्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान तळवस्ती येथे ही दोन्ही भावंडे बेपत्ता झाली होती. त्यातील पाच वर्षाची मुलगी रिया हिचा मृतदेह शिरसवडी व गोपूज गावच्या शिवेवर असणाऱ्या शेरीवस्ती येथील उरमोडी कॅनॉलच्या पाण्यात आढळला. तर मुलगा गणूचा शोध अजून सुरू आहे.
या प्रकरणी वडूज पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. तर बेपत्ता गणूचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत पोलीसांचे प्रयत्न सुरू होते. शिवेंद्रराजे ट्रेकर्सलाही पाचारण केल्याचे पोलिसांनी सांगितले.








