कोल्हापूर :
आबाजी श्री स्पर्धेत कसबा वाळवा (ता. राधानगरी) येथील शितल भांदीगरे यांच्या म्हशीने तर मानकापूर तालुका चिकोडी येथील प्रफुल्ल माळी यांच्या गायीने प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून शिरोली दुमाला येथे 13 रोजी विश्वास पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त होणाऱ्या भव्य नागरी सत्कार समारंभ प्रसंगी स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विश्वास पाटील अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने म्हैस व गाय दूध उत्पादक यांना प्रोत्साहन देण्यासाठी आबाजी श्री स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये एकूण 175 दूध उत्पादकांनी सहभाग नोंदवला. समितीच्यावतीने स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ महिला सह. दूध व्याव.संस्था क.वाळवे या संस्थेच्या म्हैस दूध उत्पादक शितल संदिप भांदिगरे यांच्या मेहसाना जातीच्या म्हैशीने एका दिवसात सकाळ व सांयकाळ असे एकूण २० लिटर ३९० मि.ली. इतके दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला. तर गाय गटामध्ये भैरवनाथ सह. दूध संस्था माणकापूरचे गाय दूध उत्पादक प्रफुल्ल राजेंद्र माळी यांच्या एच.एफ जातीच्या गायीने सकाळ व सांयकाळ असे एकूण ४२ लिटर ८३० मि.ली. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.
म्हैस गटात श्री हनुमान दूध संस्था केर्ली ता.करवीर येथील विश्वास यशवंत कदम यांच्या जाफराबादी म्हैशीने २० लिटर दूध देत द्वितीय क्रमांक मिळवला तर महालक्ष्मी दूध संस्था दुंडगे ता.गडहिंग्लज येथील किरण बाबुराव सावंत यांच्या जाफराबादी म्हैशीने १९ लिटर ९३० मि.ली. दूध तृतीय क्रमांक मिळवला. गाय गटात कै.अनुबाई पवार गुडाळवाडी ता. राधानगरी येथील सुनिल तानाजी पाटील यांच्या एचएफ जातीच्या गाईने ४० लिटर ४१०मि.ली. दूध देत द्वितीय तर समर्थ दूध संस्था रांगोळी ता.हातकणंगले येथील आप्पासो नारायण सादळे यांच्या एचएफ जातीच्या गाईने ३७ लिटर ६४० मि.ली. दूध देत तृतीय क्रमांक मिळवला. म्हैस व गाय अशा दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना 51 हजार 35 हजार आणि 25 हजार रुपये रोख असे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.








