चिपळूण :
रिक्षाचे भाडे देण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाने रिक्षा चालकावर सुरीने हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास असुर्डे रेल्वे पुलाच्या पुढे घडली. यात चालक जखमी झाला असून याप्रकरणी प्रवाशावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद चंद्रकांत कदम (35, येगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अजित तुकाराम गावणंग (51, आगवे) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजित गावणंग हे प्रवासी विनोद कदम यास रिक्षाने येगाव–बौध्दवाडी येथे घेऊन जात होते. असे असताना विनोद कदम व अजित गावणंग या दोघांमध्ये असुर्डे रेल्वे पुलाच्या पुढे रिक्षाच्या भाडे देण्यावरुन वाद झाला. याच रागातून प्रवासी विनोद कदम याने अजित गावणंग याच्या मानेवर सुरीने मागील बाजूस मारुन दुखापत केली. या प्रकरणी विनोद कदम याच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








