मार्गताम्हाने :
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने खुर्दच्या माळरानावरील फळबागांना जाणून–बुजून आगी लावण्याचे प्रकार वाढत आहेत. सोमवारी रात्री मद्यपींकडून लावण्यात आलेल्या आगीत बागायतदार देवीदास गुणाजी चव्हाण यांची 150 काजूची झाडे होरपळली. चव्हाण यांनी यासंदर्भात पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्षांकडे तक्रार केली आहे.
मार्गताम्हानेच्या विस्तीर्ण माळरानावर दरवर्षी वणवे लागतात. यातील काही वणवे हे लावले जातात. अलिकडे माळरानावर शेतकरी, बागायतदारांनी आंबा, काजूची फळलागवड केलेली आहे. अशा ठिकाणी काही मद्यपी तऊण सिगारेट ओढत मद्यपान करत असल्याचे आढळून येत आहे. रात्रीच्यावेळी माळरानावरील फळबागा या मद्यपींचे अड्डे बनले असून त्यांच्याकडूनच आग लावण्याचे कृत्य केले जात असल्याचा आरोप, चव्हाण यांनी केला आहे.
चव्हाण यांची मार्गताम्हाने इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मागे राईचा पट्टा क्षेत्रात 60 गुंठे जमिनीत काजूची बाग आहे. या बागेजवळ सोमवारी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास काही मद्यपी मद्यपान करताना आढळून आले होते. मात्र सुगावा लागताच मद्यपींनी पळ काढला.








