कोल्हापूर / कृष्णात चौगले :
विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणकडून 1 एप्रिल 2025 पासून सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी सरासरी 10 टक्के वीज दर कपात केले जाणार आहेत. मात्र या निर्णयाचा लाभ सर्वच ग्राहकांना होणार नसून तो फक्त ‘टीओडी मीटर’ असलेल्या ग्राहकांनाच होणार आहे. कोल्हापूर परिमंडलात (कोल्हापूर, सांगली जिल्हा) एकूण 1 लाख 59 हजार 664 लघु विद्युत दाब ग्राहकांनी (घरगुती आणि व्यावसायिक) टीओडी (टाईम ऑफ डे) मीटर बसविले असून या ग्राहकांनाच महावितरणच्या वीज दर कपातीचा फायदा होणार आहे.
महावितरणने सर्व निवासी ग्राहकांच्या टप्यांच्या वीज दरांमध्ये 10 ते 12 टक्क्यांच्या श्रेणीत एकूण कपात केली आहे. वीज वापर टप्पा (1-100 युनिट्स) असलेल्या निवासी ग्राहकांसाठी वीज दरांमध्ये आर्थिक वर्ष 2029-30 पर्यंत सुमारे 24 टक्के कपात केली जाणार आहे. पण घरगुती वीज वापरणाऱ्या बहुतांशी ग्राहकांकडे बसविलेल्या मीटरमध्ये टीओडीची सुविधा नाही. टीओडी सुविधा (वीज दर सवलत) मिळण्यासाठी वीज ग्राहकाने कोणत्या वेळेला विजेचा वापर केला हे समजणे आवश्यक आहे. घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी महावितरणकडून मोफत टीओडी (स्मार्ट) मीटर बसवून देण्यात येणार आहेत. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांनी टीओडी मीटर बसवून वीज दर सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणच्यावतीने केले आहे.
- वीज बिल सवलतीसाठी बसवावे लागणार टीओडी मीटर
जिह्यात सुमारे 9 लाखांहून अधिक लघुदाब ग्राहक आहेत. त्यापैकी सध्या फक्त 94 हजार ग्राहकांनी (10 टक्के) टीओडी मीटर बसविले आहेत. म्हणजेच उर्वरित 8 लाख ग्राहकांना (90 टक्के) वीज सवलत मिळवण्यासाठी टीओडी मीटर बसवावे लागणार आहेत. महावितरणकडून ही मीटर मोफत बसवून दिली जाणार आहेत. वीज गळती आणि वीज चोरी रोखण्यासाठी टीओडी मीटर फायदेशीर ठरणार असल्यामुळेच ती मोफत दिली जाणार असल्याचा महावितरणचा दावा आहे.
- टीओडी मीटरच्या वीज जोडण्या (सद्यस्थिती)
कोल्हापूर मंडळ
विभाग बदललेली वीज मीटर नवीन वीज जोडण्या पी.एम.सुर्यघर जोडण्या
गडहिंग्लज 19485 962 173
इचलकरंजी 12922 1046 606
जयसिंगपूर 12635 1250 774
कोल्हापूर ग्रा.1 17046 1772 518
कोल्हापूर ग्रा.2 16635 2062 598
कोल्हापूर अर्बन 15827 1633 877
कोल्हापूर एकूण 94550 8725 3546
सांगली मंडळ
विभाग बदललेली वीज मीटर नवीन वीज जोडण्या पी.एम.सुर्यघर जोडण्या
इस्लामपूर 10199 1024 451
कवटेमहांकाळ 7294 1270 87
सांगली ग्रा. 10829 1190 297
सांगली शहर 7088 1691 840
विटा 9358 1036 219
सांगली एकूण 44768 6211 1894
कोल्हापूर प.मं. 139318 14936 5440








