स्टोक्स, कार्से दुखापतीमुळे निवडीसाठी अनुपलब्ध
वृत्तसंस्था / लंडन
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने आगामी कसोटी हंगामासाठी आतापासूनच आपल्या पूर्वतयारीला प्रारंभ केला आहे. दरम्यान कर्णधार बेन्स स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्से दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध राहू शकले नाहीत. येत्या जून, जुलै दरम्यान भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेनंतर अॅशेस मालिका होणार आहे.
कर्णधार बेन्स स्टोक्सला झालेल्या दुखापतीमुळे तो भारताविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठीच्या निवडीवेळी उपलब्ध होऊ शकला नाही. इंग्लंड संघातील बेन्स स्टोक्स हा अनुभवी अष्टपैलु म्हणून ओळखला जातो. गेल्या डिसेंबर महिन्यात स्टोक्सला स्नायु दुखापत झाली होती आणि तो अद्याप या दुखापतीतून पूर्णपणे बरे झालेला नाही. आगामी वर्षभराच्या भरगच्च क्रिकेट हंगामासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने कसोटी क्रिकेटकरिता खेळाडूंच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. येत्या मे महिन्यात इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला जूनमध्ये प्रारंभ होईल. तसेच 2025 च्या अखेरीस इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात अॅशेस मालिका खेळण्यासाठी दाखल होईल.
स्टोक्सच्या या स्नायु दुखापतीवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून या दुखापतीच्या स्थितीमध्ये चांगलीच सुधारणा होत असल्याचे ड्युरहॅम संघाचे प्रशिक्षक रेयान कॅम्पबेल यांनी सांगितले. दरम्यान ही दुखापत पूर्णपणे बरी होणे जरुरीचे असल्याने स्टोक्सला कोणताही घाईचा निर्णय घेवू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. स्टोक्स इंग्लीश कौंटी क्रिकेटमध्ये ड्युरहॅम संघाकडून खेळतो. झिम्बाब्वे आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना 22 मे पासून सुरू होईल. तत्पूर्वी ड्यूरहॅम संघाचे इंग्लीश कौंटी क्रिकेटमधील सहा सामने होणार आहेत. स्टोक्सला या सामन्यात खेळण्याची संधी कदाचित मिळू शकेल.
इंग्लंड संघातील ब्रायडन कार्से हा वेगवान गोलंदाज आहे. पाक आणि दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळताना कार्सेच्या पायाच्या तळव्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कार्सेला ही स्पर्धा अर्धवट सोडावी लागली होती. कार्सेची ही दुखापत लवकरच पूर्णपणे बरी होईल आणि तो इंग्लंडच्या आगामी क्रिकेट हंगामासाठी उपलब्ध राहिल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. कार्से पूर्ण तंदुरुस्त झाल्यास त्याला कसोटीसाठी इंग्लंड निवड समितीकडून निश्चितच पहिले प्राधान्य मिळेल. 2025 च्या उन्हाळी आणि हिवाळी मोसमामध्ये इंग्लंडचा संघ 11 कसोटी सामने खेळणार आहे. भारताविरुद्धची कसोटी मालिका खेळण्यास कार्से उत्सुक आहे. पण दुखापतीची समस्या त्याला सध्या भेडसावत आहे.









